पणजी : पुढारी वृत्तसेवा
चतुर्थीच्या सणादरम्यान कदंब वाहतूक महामंडळाने महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात विशेष आंतरराज्य बससेवा सुरू केली होती. गोव्यातून ये-जा करणाऱ्या प्रवाशांसाठी १०८ बसेस सुरू करून त्यांच्या २२४ फेऱ्या सुरू ठेवल्या होत्या.
आठ दिवसांच्या कालावधीत कदंबने ६० लाखांपेक्षा जास्त महसूल प्राप्त केला आहे, अशी माहिती कदंब वाहतूक महामंडळाचे अध्यक्ष उल्हास तुयेकर यांनी दिली. महामंडळाच्या कार्यालयात बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत तुयेकर बोलत होते. यावेळी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक रोहन कासकर आणि इतर अधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना तुयेकर यांनी सांगितले की, चतुर्थीच्या सुरुवातीचे काही दिवस ११ सप्टेंबर ते १३ सप्टेंबर दरम्यान, तसेच ५ व्या व ७ व्या दिवसाच्या विसर्जनानंतर वाढलेली मागणी लक्षात घेऊन १६ सप्टेंबर ते २० सप्टेंबर या कालावधीत कदंबने दररोज २१४ फेऱ्या चालवल्या. या मार्गावर वाहतुकीसाठी एसी स्लीपर, व्हॉल्व्हो, लक्झरी आणि सेमी-लक्झरी बसेस उपलब्ध करण्यात आल्या होत्या.
महिला बचत गटांना तात्पुरते 'स्टॉल्स'
महिला बचत गटांना तात्पुरते स्टॉल्स 'स्वयंपूर्ण गोवा' या संकल्पनेला बळ देण्यासाठी कदंबने गोव्याच्या विविध गावांतील महिला बचत गटांना काणकोण, मडगाव यांसारख्या कदंब बस स्थानकांवर कोणतेही शुल्क न घेता तात्पुरते स्टॉल्स उभारण्यासाठी परवानगी दिली होती, अशी माहिती कदंब वाहतूक महामंडळाचे अध्यक्ष उल्हास तुयेकर यांनी दिली.