पणजी : केरळच्या तोडीस तोड असलेले निसर्ग सौंदर्य, अनेक गावांना जोडणारे नद्यांचे प्रवाह जल वाहतुकीसाठी पोषक आहेत. अनेक वर्षे एका किनाऱ्यावरून दुसऱ्या किनाऱ्यावर प्रवाशांची ने आण व्हायची. मात्र, आता नवा क्रांतिकारी बदल राज्य सरकार आणि नदी परिवहन मंत्र्यांच्या पुढाकाराने नदी परिवहन खाते करणार आहे. कोचीच्या धर्तीवर राज्यात महत्त्वाकांक्षी जल मेट्रो सेवा सुरू करण्यात येणार आहे. राज्याच्या जल परिवहन सेवेतील हा प्रकल्प नक्कीच मैलाचा दगड ठरणार आहे.
भारतातील पहिली कोची जल मेट्रो २५ एप्रिल २०२३ रोजी सुरू झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळमधील कोची येथे जल मेट्रो सेवेचे उद्घाटन केले होते. ही पर्यावरणपूरक आणि आधुनिक जलवाहतूक प्रणाली असल्याने गोव्यातही या सेवेचा लवकरच प्रारंभ होणार आहे.
भारतातील पहिली कोची जल मेट्रो २५ एप्रिल २०२३ रोजी सुरू झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळमधील कोची येथे जल मेट्रो सेवेचे उद्घाटन केले होते. ही पर्यावरणपूरक आणि आधुनिक जलवाहतूक प्रणाली असल्याने गोव्यातही या सेवेचा लवकरच प्रारंभ होणार आहे.
गोव्यातील प्रस्तावित जल मेट्रोमध्ये राज्याच्या एकूण वाहतूक व्यवस्थेत लक्षणीय परिवर्तन घडवून आणण्याची आणि पर्यटन व वाहतूक क्षेत्राला नव्याने परिभाषित करण्याची क्षमता आहे. हा प्रकल्प विलग मागएिवजी संपूर्ण गोवा राज्याला नदी प्रवाहाच्या माध्यमातून सेवा देणारे एकसंध जाळे म्हणून नियोजित आहे. सध्या, गोव्याची जलवाहतूक मोठ्या प्रमाणावर असंघटित आणि विखुरलेल्या पद्धतीने चालते. प्रस्तावित प्रकल्पामुळे केवळ देशी आणि विदेशी पर्यटकांनाच नव्हे, तर काम, शिक्षण आणि अत्यावश्यक सेवांसाठी दररोजच्या प्रवासावर अवलंबून असलेल्या स्थानिक प्रवाशांनाही फायदा होईल.
भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर वसलेले गोवा राज्य, नद्या आणि खाड्यांच्या विस्तृत जाळ्याने समृद्ध आहे, जे वाहतूक, पर्यटन आणि स्थानिक उपजीविकेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. मांडवी, झुआरी आणि शापोरा यांसारख्या प्रमुख नद्या राज्यातून वाहतात आणि अंतर्गत प्रदेशांना अरबी समुद्राशी जोडून एक महत्त्वाची वाहतूक प्रणाली तयार करतात.
प्रस्तावित जलवाहतूक प्रणाली (जल मेट्रो) याच नद्यांच्या काठावर नियोजित आहे. याला राष्ट्रीय जलमार्ग-६८ म्हणून घोषित करण्यात आले आहे. प्रस्तावित गोवा जलवाहतूक प्रकल्पाचे उद्दिष्ट मांडवी-झुआरी नदी प्रणाली आणि किनारी मार्गावर एक सुरक्षित, कार्यक्षम आणि शाश्वत फेरी आधारित प्रवासी वाहतूक प्रणाली स्थापित करणे आहे. ही प्रणाली गोव्यातील प्रमुख शहरी केंद्रे, वाहतूक केंद्रे आणि पर्यटन स्थळांना जोडेल, त्यामुळे प्रादेशिक कनेक्टिव्हिटी वाढेल, पर्यटन गतिशीलतेला चालना मिळेल आणि गर्दीच्या रस्त्यांवरील अवलंबित्व कमी होईल.
जल मेट्रो समोरील आव्हाने
गोव्यातील प्रस्तावित जल मेट्रोसमोर अनेक आव्हाने आहेत. जल मेट्रोला समुद्र आणि नदी संगमाच्या परिस्थितीला सामोरे जावे लागणार आहे. विशेषतः फोर्ट आग्वाद जवळ जोरदार लाटा आणि भरती ओहोटीच्या शक्तीमुळे लाटारोधक बांधकामांची आवश्यकता भासू शकते. साहजिकच भांडवली आणि देखभालीचा खर्च वाढेल. बागा खाडीसारख्या भरती-ओहोटीच्या खाड्या आणि नदी मुखांमध्ये गाळ साचण्याची आणि वाळूचे दांडे तयार होण्याची शक्यता असते. त्यामुळे जल वाहतुकीच्या योग्य खोलीवर परिणाम होऊ शकतो आणि नियमितपणे गाळ काढण्याची गरज भासू शकते.
किनारी आणि समुद्राजवळील मार्ग प्रतिकूल मान्सून हवामानास असुरक्षित आहेत, ज्यामुळे वेळोवेळी सेवा खंडित होऊन जलवाहतुकीच्या सुरक्षिततेबद्दल चिंता निर्माण होते. याव्यतिरिक्त, सध्या मोफत फेरी सेवेकडून तिकीट आधारित प्रणालीकडे संक्रमण करताना सामाजिक आणि प्रशासकीय आव्हाने निर्माण होऊ शकतात. त्यासाठी भाड्याची काळजीपूर्वक रचना करणे आणि संबंधित घटकांशी संवाद साधणे आवश्यक आहे.
रस्त्यावरचा ताण होणार कमी : भोसले
नदी परिवहन म्हणजे नदीचा प्रवाह जिथपर्यंत जातो, तिथपर्यंत वाहतूक सेवा देणे असा आहे. सध्या आम्ही प्रवाशांना अलीकडच्या किनाऱ्यावरून पलीकडच्या किनाऱ्यावर नेतो. जल मेट्रोमुळे खऱ्या अर्थाने नदी परिवहन सेवा प्रत्यक्षात येईल आणि रस्त्यावरील वाहतुकीचा ताणही कमी होईल, असे नदी परिवहन खात्याचे संचालक विक्रमसिंह राजे भोसले यांनी सांगितले.
जल मेट्रो प्रकल्पाचा उद्देश
या प्रकल्पाचा मुख्य उद्देश राष्ट्रीय जलमार्ग-६८ अंतर्गत असलेल्या नदीच्या विद्यमान जल वाहतुकीस योग्य भागांचा प्रवासी फेरी सेवेसाठी उपयोग करणे. प्रवाशांची सुरक्षित आणि विश्वसनीय वाहतुकीसाठी तो नैसर्गिक नदी व खाडीच्या परिसंस्थेमध्ये कार्यरत राहण्यासाठी तयार करणे.
जल मेट्रोचे प्रस्तावित थांबे
पणजी, कुंभारजुवे, बेती, टोंक, बिठ्ठोण, सारमानस, रायबंदर, कुठ्ठाळी, चोडण बेट, मडकई, सापेंद्र, रासई, दिवाडी बेट, आडपई, आंबोई, दुर्भाट, वांशी, केरी, पिएदाद, तेरेखोल, जुने गोवे, वास्को, नार्वे, रेईश मागुश, सां मातियश, फोर्ट आग्वाद, टोल्टो, बागा क्रीक, धावजी, शापोरा किल्ला, गवंडाळी, दोना पावला.
बोट पार्किंग सुविधा (मरिना)
प्रस्तावित गोवा जलवाहतूक प्रणाली अंतर्गत जहाजांचे कार्यक्षम संचालन, देखभाल आणि ताफा व्यवस्थापन करण्यासाठी बेती, चोडण व जुने गोवे येथे समर्पित बोट पार्किंग सुविधा (मरिना) प्रस्तावित आहेत. याचा उद्देश प्रवासी टर्मिनलवरील गर्दी कमी करणे, कामकाजाच्या वेळेव्यतिरिक्त जहाजांना व्यवस्थितपणे धक्क्याला लावता येणे असा आहे.
जल मेट्रोचे प्रस्तावित मार्ग
मार्ग मार्ग क्र. अंदाजे लांबी सेवेचा प्रकार (किमी)
१ पणजी-बिठ्ठोण-चोडण बेट-आंबोई-वांशी-नार्वे १२.३ किमी फेरी मार्ग
२ बेती-पणजी-रायबंदर-दिवाडी बेट-सापेंद्र-जुने गोवे ९.८ किमी फेरी मार्ग
३ जुने गोवे-पिएदाद-सां मातियश-नार्वे-सारमानस-टोंका १०.९ किमी फेरी मार्ग
४ वास्को- कुठ्ठाळी ८.६ किमी फेरी मार्ग
५ कुठ्ठाळी मडकई रासई- आडपई - दुर्भाट १२.१ किमी फेरी मार्ग
६ जुने गोवे टोलटो - धावजी - गवंडाळी - कुंभारजुवे ४.७ किमी फेरी मार्ग
७ पणजी दोना पावला - वास्को १४.८ किमी रो-पॅक्स
८ पणजी-रेईस मागुश- फोर्ट आग्वाद-बागा शापोरा किल्ला २३.६ किमी रो-पॅक्स
९ शापोरा फोर्ट-केरी-तेरेखोल १४.२ किमी
भविष्यातील प्रस्ताव एकूण : १११ किमी (पहिल्या टप्प्यात मार्ग १, २, ३, ५, ६, ७ आणि ८ विकसित करण्याचा प्रस्ताव आहे, तर प्रामुख्याने पर्यटन-केंद्रित असलेला मार्ग ४ (वास्को कुठ्ठाळी) दुसऱ्या टप्प्यात राबवण्याचे नियोजन आहे आणि मार्ग ९ (शापोरा किल्ला केरी तेरेखोल) भविष्यातील टप्प्यासाठी विचारात घेतला जात आहे.)
"जल मेट्रो" संबंधी महत्त्वाच्या बाबी
एकूण मार्गाची संख्या - ९ (भविष्यातील मार्गासह)
प्रस्तावित टर्मिनलची संख्या-३२
एकूण मार्गाची लांबी - १११ किमी
बोटींची संख्या - ८७
बोट पार्किंग सुविधा - बेती, चोडण व जुने गोवे