रशियातून गोव्यामध्ये दाखल झालेल्या पर्यटकांचे स्वागत करताना पदाधिकारी Pudhari Photo
गोवा

गोव्यामध्ये आंतरराष्ट्रीय पर्यटनाला सुरुवात

पुढारी वृत्तसेवा

पणजी : राज्याच्या आंतरराष्ट्रीय पर्यटन हंगामाला बुधवार (दि.2)पासून अधिकृत सुरुवात झाली. रशियातील मॉस्को व याक्तरीनबर्ग येथील प्रवाशांना घेऊन यंदाच्या हंगामातील पहिली दोन चार्टर विमाने मोपच्या मनोहर आंतराष्ट्रीय विमानतळावर उतरली. विमानतळ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या चार्टर विमानामधून २१० आणि १३९ असे मिळून ३४९ विदेशी पर्यटक गोव्यात दाखल झाले आहेत. या सर्व रशियन पर्यटकांचे मोप आंतरराष्ट्रीय विमानतळावर पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. यातील बहुतांश पर्यटक तीन महिन्याच्या पर्यटन व्हिसांवर आल्याने पुढील तीन महिने गोव्याच्या आदरातिथ्याचा आनंद घेतील. या पर्यटकांच्या आगमनाने टॅक्सी चालक, हॉटेल व्यावसायिक आणि पर्यटन क्षेत्राशी संबंधीत घटकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. 

पर्यटन मंत्री रोहन खंवटे म्हणाले गोव्यात येणाऱ्या सर्व पर्यटकांना आवश्यक त्या सोयीसुविधा पुरवण्यावर सरकारचा भर आहे. स्थानिक पंचायती, पालिका तसेच स्थानिक आमदारांनी यात लक्ष घालत पर्यटकांची कोणतीही गैरसोय होणार नाही खबरदारी घ्यावी असे त्यांनी म्हटले आहे. पर्यटकांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी भासल्यास त्या पर्यटन खात्यातर्फे तत्काळ सोडवल्या जातील असेही ते म्हणाले. पर्यटन व्यवसायाला चालना देण्यासाठी खात्यातर्फे नेहमीच अभिनव उपक्रम राबविले जातात. गोव्यात पर्यटकांना मिळणाऱ्या साधन सुविधा, खाद्य-संस्कृती, अंतर्गत पर्यटन,आध्यात्मिक तसेच वेलनेस पर्यटनासाठी प्रयत्न केले जात आहेत. स्थानिक व्यावसायिकांना शॅक्स उभारणीसाठी यापूर्वीच परवाने देण्यात आले आहेत. समुद्र किनाऱ्यांवर पायाभूत सुविधा उभारण्यावर अधिक लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. पर्यटन हंगामला आजपासून अधिकृत सुरू झाल्याने पर्यटनाशी संबंधित सर्व व्यावसायिकांना दिलासा मिळाला आहे. किनाऱ्यावरील शॅक्समालकांतर्फे पुढाकार घेऊन अत्यंत गरजेच्या सुखसुविधा येत्या काही दिवसांत पर्यटकांसाठी उपलब्ध केल्या जातील.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT