पणजी : पुढारी वृत्तसेवा
काँग्रेसमध्ये अजूनही नाराजीनाट्य सुरूच आहे. 'हा घ्या पुरावा,' असे म्हणत कार्यकारी अध्यक्ष एम. के. शेख यांनी अमित पाटकर यांना पाठवलेला व्हॉट्सअॅप मेसेज पत्रकारांना बैठकीत दाखवला. तसेच प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी अमित पाटकर खोटारडे आहेत, असा आरोप केला. गेले काही दिवस काँग्रेसमध्ये कलगीतुरा रंगत आहे. काँग्रेसमधील हा वाद भाजपच्या पथ्यावर पडण्याचा अंदाज राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.
विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी विरोधी आमदारांच्या बैठकीसाठी गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांना निमंत्रण दिले की नाही, याचा वाद शमतो न शमतो तोच काँग्रेसमध्येच बैठकीच्या निमंत्रणावरून नवा वाद रंगला आहे.
राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीसाठी निमंत्रित करण्यात आले नसल्याचा आरोप काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी केल्याने पक्षातील अंतर्गत मतभेद पुन्हा चव्हाट्यावर आले आहेत. अमित पाटकर यांनी मंगळवारी सकाळी पत्रकारांशी संवाद साधताना बैठकीबाबत आपण अनभिज्ञ असल्याचे सांगितले. आज कोणती बैठक आहे, याची आपल्याला माहिती नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे सोमवारी गोव्यात येणार असल्याची माहितीही आपल्याला प्रसारमाध्यमांतूनच मिळाली, असे त्यांनी सांगितले. गोव्यात इतर विरोधी पक्षांना बरोबर घेऊन निवडणूक लढवावी, या धोरणावर काँग्रेस पक्ष ठाम आहे. मात्र निवडणूक युतीबाबतचे निर्णय आधी राज्यस्तरीय नेतृत्वाकडून घेतले जातील. त्यानंतर प्रस्तावित युती मंजुरीसाठी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे पाठवली जाईल, असे काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी स्पष्ट केले.
खर्गे यांनी सांगितले की, काँग्रेसची बैठक यशस्वी झाली असून, सर्व नेते एकजुटीने एकत्र आले आहेत आणि निवडणूक जिंकण्यासाठी मिळून लढू. एम. के. शेख यांनी पीएससी बैठकीसंदर्भात पाटकर यांना पाठवलेल्या व्हॉट्सअॅप संदेशाचा पुरावा सादर केला. राजकीय व्यवहार समितीची बैठक १८ रोजीच्या सकाळी ठीक १०.०० वाजता आयटीसी ग्रँड, गोवा, बेतालभाटी येथे बोलावण्यात आली आहे.
बैठकीला काँग्रेस अध्यक्ष श्री मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह एआयसीसी प्रभारी माणिकराव ठाकरे, एआयसीसी सहप्रभारी डॉ. अंजली निंबाळकर आणि इतर राज्य नेते उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे आपण आपल्या सोयीनुसार उपस्थित राहावे, अशी विनंती. असा तो संदेश होता. त्याचा पुरावा एम. के. शेख यांनी काँग्रेसला दिला. शेख यांनी हा संदेश व्हॉट्सअॅपद्वारे पाठवला होता आणि त्यावर एकच टिक मार्क दिसत होती.
चोडणकर म्हणाले की, काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष एम. के. शेख यांनी पाटकर यांच्याशी बैठकीसंदर्भात फोनवरून संपर्क साधला होता. या फोन कॉलचा पुरावा, तसेच बैठकीसाठी निमंत्रण देणारा व्हॉट्सअॅप संदेशही पाटकर यांना पाठवण्यात आला होता. पीएससी बैठकीच्या निमंत्रणावरून काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर चोडणकर यांनी पाटकर यांच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पाटकर यांना बैठकीचे निमंत्रण दिले नव्हते, असे म्हणणे चुकीचे आहे.
काँग्रेसच्या पीएससी बैठकीचे निमंत्रण मिळाले नसल्याचा दावा प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर यांनी केल्याच्या पार्श्वभूमीवर गोवा प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी त्यांच्यावर पलटवार केला आहे. पाटकर यांना बैठकीसाठी निमंत्रण देण्यात आले होते, हे सिद्ध करणारे पुरावे काँग्रेसकडे असल्याचा दावा चोडणकर यांनी केला. अमित पाटकर खोटारडे असल्याचा पलटवारही केला.
माजी प्रदेशाध्यक्ष या नात्याने खर्गे यांच्या स्वागतासाठी विमानतळावरल्यानंतर प्रदेश प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी बैठकीसाठी बोलावल्याने आपण बैठकीला गेलो, असे अमित पाटकर यांनी स्पष्ट केले. याचवेळी त्यांनी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांच्यावर मिश्कील टोला लगावत, 'वय झाल्याने ते निमंत्रण देण्यास विसरले असावेत', असा चिमटाही पाटकर यांनी काढला.
अमित पाटकर यांना बैठकीचे निमंत्रण दिले होते. ते आले नाहीत. कोणावर विश्वास ठेवायचा हे तुम्ही ठरवा, असे सहप्रभारी डॉ. अंजली निंबाळकर यांनी स्पष्ट केले.
पणजी काँग्रेसचा त्याग करून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या त्या १९ आजी-माजी आमदारांना काँग्रेसने पुन्हा उमेदवारी देऊ नये, अशी मागणी एनजीओंच्या प्रतिनिधींनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे केली. पक्षाने जागा वाटप १५ सप्टेंबरपर्यंत जाहीर करावे, अशी मागणीही एनजीओंनी केली. राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या अध्यक्षतेखाली दक्षिण गोव्यात मंगळवारी काँग्रेसच्या राजकीय व्यवहार समितीची (पीएससी) बैठक झाली. बैठकीपूर्वी विविध एनजीओंच्या प्रतिनिधींसह चर्चची संस्था सीएसजेपी, तसेच कॅथोलिक असोसिएशन ऑफ गोव्याच्या प्रतिनिधींनीही खर्गे यांची भेट घेतली. त्यावेळी ही मागणी करण्यात आली.
काँग्रेसला युती हवी की नको ते त्या पक्षाच्या नेत्यांनी स्पष्ट करावे, अशी सूचना आम आदमी पक्षाने केली आहे. आपचे कार्याध्यक्ष गेर्सन गोम्स यांनी मंगळवारी एक व्हिडिओ जारी करून आघाडीबाबत काँग्रेसकडून स्पष्टीकरण मागितले आहे. ते म्हणतात, काँग्रेसच्या आपसातील नियमित राजकीय हालचालींमुळे आम्हाला वेदना होत आहेत. हल्ले होत असूनही आम्ही गप्प आहोत. कारण आम्हाला एकत्र येऊन भाजपला हरवायचे आहे, असे म्हटले आहे.