पणजी : टास्क फोर्स आणि सार्वजनिक बांधकाम खात्याची समिती यांनी दिलेला अहवाल सरकारला मिळाला आहे. त्यातील सूचनेनुसार, कला अकादमीतील त्रुटींची दुरुस्ती कंत्राटदाराकडून त्यांच्याच खर्चाने करून घेतली जाणार आहे. त्यानंतर त्यांना काळ्या यादीत टाकणार, ऑक्टोबरपर्यंत ही कामे होतील, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. कला अकादमीच्या दुरुस्तीबाबत विचारले असता त्यांनी ही माहिती दिली.
कला अकादमीसंदर्भात समितीने केलेल्या शिफारशीनुसार, आवाज व विजेची संबंधित तज्ज्ञांना बरोबर घेऊन दुरुस्ती केली जाईल. मागील निविदांमधून झालेल्या त्रुटींची दुरुस्ती संबंधित कंत्राटदार ऑक्टोबरपूर्वी मोफत करणार आहेत. हे काम पूर्ण झाल्यावर, कंत्राटदाराची सेवा रद्द करून त्याला काळ्या यादीत टाकण्यात येईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. मागील निविदेत समाविष्ट नसलेली अतिरिक्त कामे नव्या निविदा प्रक्रियेद्वारे समाविष्ट केली जाणार आहेत. हे सर्व काम पारदर्शक पद्धतीने आणि गुणवत्ता लक्षात घेऊन केले जाईल, याची काळजी सरकार घेईल, असे सांगून कामे पूर्ण झाल्याशिवाय त्यांना ठरलेली रक्कम दिली जाणार नाही. राज्यातील सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी आणि भविष्यातील अनियमितता टाळण्यासाठी ही कारवाई एक धडा ठरेल, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी यावेळी सांगितले.
म्हादई नदी जलवाटप व पर्यावरणीय परिणामांबाबत नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफीकडून सादर करण्यात आलेला अहवाल सरकारकडे आला असून, तो आपण वाचलेला नाही. तो वाचल्यानंतर या विषयावर बोलेन. राज्य सरकार म्हादईप्रश्नी पूर्णपणे सतर्क असून, म्हादईप्रश्नी कुठलीच तडजोड करणार नाही, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.