IndiGo flight cancellations | इंडिगोची 31 विमान उड्डाणे रद्द File Photo
गोवा

IndiGo flight cancellations | इंडिगोची 31 विमान उड्डाणे रद्द

मोप-दाबोळी विमानतळावरील प्रकार; प्रवाशांचे हाल

पुढारी वृत्तसेवा

पणजी/दाबोळी : इंडिगो एअरलाईन्सच्या देशभरात रद्द झालेल्या विमानोड्डाणांचा फटका गोव्यालाही बसला असून, मोपा-दाबोळी विमानतळावरील 31 विमान उड्डाणे शुक्रवारी रद्द करण्यात आली आहेत. विमान उड्डाणे रद्द झाल्याची कोणतीही पूर्वसूचना नाही आणि सेवा पूर्ववत कधी होईल याबाबत स्पष्टनसल्याने प्रवाशांचे बरेच हाल झाले आहेत. विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून, प्रवासी संताप व्यक्त करत आहेत.

विमानतळाच्या एक्स हँडलवरील पोस्टवर रद्द करण्यात येणार्‍या विमान उड्डाणांची माहिती देण्यात येत असली तरी अचानक विमाने रद्द झाल्यानंतर प्रवाशांचे काय? त्यांची कोणतीही पर्यायी व्यवस्था न केल्याने संतापाची लाट उसळली आहे. गोव्यातील दोन्ही आंतरराष्ट्रीय विमानतळांवर इंडिगोच्या व्यवस्थापकीय त्रुटींचा प्रभाव त्यांच्या फिस्कटलेल्या वेळापत्रकात दिसून आला आहे. प्रवाशांची गैरसोय कमी करण्यासाठी व सुरक्षा मानके कायम ठेवण्यासाठी इंडिगोने ए320 विमानांच्या संचालनासाठी एफडीटीएल तरतुदींत बदल करण्याची मागणी नागरी विमानोड्डाण महासंचालनालयाकडे (डीजीसीए) केली आहे.

दाबोळी व मोप विमानतळावरून रद्द करण्यात आलेल्या उड्डाणांत बंगळुरू, इंदूर, मुंबई, नवी दिल्ली, भोपाळ, जयपूर, सुरत, हैद्राबाद, रायपूर व चेन्नई या महत्त्वाच्या मार्गावरील विमानांचा समावेश आहे. ज्यांनी आंतरराष्ट्रीय विमानांची तिकिटे बुकिंग करून इंडिगो विमानसेवा घेतली होती त्यांचे नुकसान झाले आहे. रद्द झालेल्या व पुन्हा बुकिंग केलेल्या प्रवाशांसाठी इंडिगोच्या समन्वयाने प्रवाशांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करण्यात आल्याचे विमानतळ प्रशासनाने स्पष्ट केले असले तरी देशी व विदेशी प्रवाशांना विमानतळावरच तिष्ठत राहण्याची पाळी आली आहे. इंडिगो कंपनीची विमान उड्डाणे रद्द झाल्याचा परिणाम देशभरात झाल्याने डीजीसीएने तातडीने पावले उचलून यावर पर्याय म्हणून कंपन्यांना आठवड्याच्या विश्रांतीसह सुट्टी देण्यास मनाई करणारा कायदा शिथिल केला आहे, त्याचे पत्रक जारी करण्यात आले आहे.

क्रू मेंबर्स, पायलटांची संख्या कमी तरीही...

इंडिगो एअरलाईन्सने त्यांच्याकडे कर्मचारी (क्रू मेंबर्स) व वैमानिकांची (पायलट) संख्या कमी असतानाही विमानांच्या उड्डाणाचे नियोजन मोठ्या प्रमाणात केले होते. मात्र, नोव्हेंबरपासून डीजीसीएची नवीन नियमावली लागू करण्यात आल्याने त्याचा मोठा फटका इंडिगोला बसला.

...म्हणून कोलमडले व्यवस्थापन

कमी कर्मचार्‍यांमध्ये जादा काम करून घेण्याच्या या कंपनीच्या जुन्या सवयीमुळे व्यवस्थापन कोलमडल्याची कबुली यापूर्वीच देण्यात आली आहे. नागरी विमानोड्डाण महासंचालनालयाने या समस्येचे कारण सुधारित फ्लाईट ड्युटी टाईम लिमिटेशन्स नियमांच्या अंमलबजावणीतील चुका व नियोजनातील त्रुटी असल्याचे स्पष्ट केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT