Rohan khawante 
गोवा

Mandrem Goa First Edge City | मांद्रे येथे देशातील पहिली 'एज सिटी'

Mandrem Goa First Edge City | पर्यटनमंत्र्यांची घोषणा; गोव्याला सर्जनशीलतेचे केंद्र बनविण्याचे उद्दिष्ट

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा

गोव्याला देशाची सर्जनशील राजधानी बनविण्याच्या उद्देशाने उत्तर गोव्यातील मांड्रे येथे देशातील पहिली 'एज सिटी' उभारण्याचा उपक्रम हाती घेण्यात येणार आहे. तंत्रज्ञान, संशोधन, उद्योजकता आणि नवोन्मेषाच्या क्षेत्रात गोव्याची ओळख निर्माण करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार आहे.

या उपक्रमाची घोषणा पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी शनिवारी पणजी येथील पर्यटन भवनात आयोजित पत्रकार परिषदेत केली. यावेळी एज सिटीच्या भागीदारी व संशोधन विभागाचे प्रमुख टेलामोन अर्दावानिस, माहिती तंत्रज्ञान खात्याचे संचालक कबीर शिरगावकर तसेच इतर अधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना मंत्री खंवटे म्हणाले की, गोव्याची ओळख केवळ पर्यटनापुरती मर्यादित न ठेवता तंत्रज्ञान, संशोधन, उद्योजकता आणि नवोन्मेषाचे केंद्र म्हणून राज्याचा विकास करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. या उपक्रमामुळे राज्यातील विद्यार्थी, स्टार्टअप्स, उद्योजक आणि स्थानिक व्यावसायिकांना जागतिक तज्ज्ञांशी संवाद साधण्याची तसेच सहकार्याच्या नव्या संधी शोधण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

जागतिक स्तरावरील कौशल्य आणि स्थानिक उद्योग यांची सांगड घालून तरुण व उद्योजकांसाठी नव्या संधी निर्माण करणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. यामुळे राज्यातील तंत्रज्ञान क्षेत्राला चालना मिळण्यासोबत नव्या कल्पना आणि व्यावसायिक संकल्पनांच्या विकासासाठी पोषक वातावरण निर्माण होण्यास मदत होईल, असेही त्यांनी सांगितले. या उपक्रमाचा एक भाग म्हणून २८ ते ३१ ऑक्टोबरदरम्यान 'हॅकर हाऊस गोवा' आणि हॅकाथॉनचे आयोजन करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमात निवडक तंत्रज्ञान विकासक कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि क्रिप्टो तंत्रज्ञानाशी संबंधित प्रकल्पांवर काम करतील. हा उपक्रम गोव्याच्या 'वर्क फ्रॉम गोवा' या संकल्पनेलाही चालना देणारा ठरेल. तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यावसायिक, संशोधक आणि उद्योजकांना गोव्याकडे आकर्षित करून राज्यात नव्या संधी निर्माण करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT