पणजी : भारतीय नौदलाच्या 'आयएनएस तर्कष' या पश्चिम कमांडअंतर्गत कार्यरत आघाडीच्या युद्धनौकेने हिंद महासागराच्या पश्चिम क्षेत्रातील गस्तीदरम्यान २,५०० किलो अंमली पदार्थ जप्त केले. या कारवाईतून भारतीय नौदलाची सागरी गुन्हेगारीविरुद्ध लढण्याची व क्षेत्रिय सुरक्षा बळकट करण्याची अतूट वचनबद्धता अधोरेखित होते. ही या वर्षातील मोठी कार्यवाही आहे.
जानेवारी २०२५ मध्ये सागरी सुरक्षेसाठी हिंद महासागराच्या पश्चिम क्षेत्रात तैनात करण्यात आलेली 'आयएनएस तर्कष' ही युद्धनौका 'संयुक्त कृती दल १५०' या पथकाला सक्रिय मदत करते. हा संयुक्त सागरी सुरक्षा दलाचा एक भाग असून त्याचा तळ बहारिनमध्ये आहे. ही युद्धनौका ऍन्झॅक टायगर या बहुराष्ट्रीय संयुक्त उद्देश लष्करी मोहीमेत सहभागी झाली आहे.
३१ मार्च रोजी गस्तीवर असताना आयएनएस तर्कष युद्धनौकेला पी ८१ या भारतीय नौदलाच्या विमानाकडून त्या भागातील संशयास्पद नौकांची माहिती मिळाली. या नौका अंमली पदार्थांच्या तस्करीसह अन्य बेकायदेशीर कृत्यांमध्ये सहभागी असल्याची माहिती मिळाल्यानंतर तर्कष युद्धनौकेने आपला मार्ग बदलून संशयास्पद नौकांच्या मार्गात हस्तक्षेप केला.
आसपासच्या सर्व संशयित नौकांची कायदेशीर चौकशी केल्यानंतर मुंबईतील सागरी कारवाई केंद्र आणि पी-८१ विमानाच्या समन्वयाने तर्कषवरील अधिकाऱ्यांनी एका संशयित नौकेवर प्रवेश केला. याशिवाय तर्कषवरील हेलिकॉप्टरद्वारे संशयास्पद नौकांवरील हालचालींवर देखरेख ठेवण्यात आली व त्या भागातील आणखी अशाच संशयास्पद नौकांचा शोध घेण्यात आला.
सागरी कमांडोंसह विशेष पथकाने संशयास्पद नौकेवर दाखल होऊन शोधमोहीम राबवली. यामध्ये विविध बंद पाकिटे आढळली. पुढील तपासात या नौकांमधील वेगवेगळ्या भागांमध्ये, वेगवेगळ्या कप्प्यांत २५०० किलोपेक्षा जास्त अंमली पदार्थ (२३८६ किलो हशीश व १२१ किलो हेरोइन) सापडले. या नौकेवर आयएनएस तर्कष युद्धनौकेने यशस्वीरित्या ताबा मिळविला आणि नौकेवरील कर्मचाऱ्यांची त्यांच्या कार्यपद्धतीबाबत तसेच त्या भागात असलेल्या अन्य नौकांबाबत सखोल चौकशी केली.
या जप्ती कारवाईतून समुद्रातील अंमली पदार्थ तस्करीसह इतर बेकायदेशीर कृत्यांचा बीमोड व प्रतिबंध करण्यातील भारतीय नौदलाचे सामर्थ्य आणि व्यावसायिकता अधोरेखित होते.
Indian Navy operation, drugs seizure, 2500 kg drugs, narcotics bust, Indian Navy news, drug trafficking, anti-narcotics operations, Indian Navy achievements, Maharashtra news, drug smuggling crackdown