पणजी/वास्को : ‘नाविका सागर परिक्रमा -2’ ही आठ महिन्यांमध्ये पूर्ण करताना, जी मोठी कामगिरी केली आहे, त्या कामगिरीचा देशवासीयांना मोठा अभिमान आहे. हा एक ऐतिहासिक दिवस आहे. आठ महिने एकांतपणात घालविताना मानसिक व शारीरिक समस्यांना जे तोंड दिले आहे, ते मानवासाठी एक उदाहरण असेल. ‘ऑपरेशन सिंदूर’च्या पार्श्वभूमीवर भारतीय नौदलाच्या लेफ्टनंट कमांडर रूपा ए. आणि लेफ्टनंट कमांडर दिलना के या दोघींनी देशाचा सन्मान अधिक वाढविला आहे, असे गौरवोद्गार संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी गुरुवारी काढले.
भारतीय नौदलाच्या लेफ्टनंट कमांडर रूपा ए. आणि लेफ्टनंट कमांडर दिलना के या दोन महिला ‘तारिणी’ या शिडाच्या बोटीने सागर परिक्रमा पूर्ण करून आठ महिन्यांनी गोव्यात परतल्या. त्यांच्या स्वागतासाठी मुरगाव बंदरात आयोजित केलेल्या कार्यक्रमाला संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी विशेष उपस्थिती लावली होती. रुपा ए. व दिलना के यांचे मुरगाव बंदरात आगमन झाल्यावर नौदलाच्या हेलिकॉप्टर्सनी तसेच शिडाच्या बोटींनी स्वागत करून त्यांना धक्क्यावर आणले. तेथे राजनाथ सिंह व नौदल प्रमुख अॅडमिरल दिनेश त्रिपाठी व इतर नौदल अधिकार्यांनी त्यांचे स्वागत केले.
राजनाथ सिंह यांनी त्या दोघींचे अभिनंदन करताना आम्हाला तुमचा अभिमान असल्याचे वारंवार सांगितले. लोकांच्या ह्रदयात तुम्ही स्थान मिळविले आहे. नाविक सागर परिक्रमाप्रसंगी आलेल्या प्रत्येक क्षणाचे लेखन करा जेणेकरून पुढील पिढी प्रेरित होईल. तुमच्या कामगिरीमध्ये आणखी एक कामगिरीची भर पडली आहे, असे संरक्षणमंत्री सिंह म्हणाले. निसर्गावर विजय मिळविणे शक्य नाही तथापी निसर्ग समजावून घेतला पाहिजे. तुम्ही आपल्या परिक्रमेमध्ये निसर्ग समाजावून घेतला. हे प्रत्येकाला शक्य नाही. ज्याच्यावर ईश्वरी कृपा असते, त्यानांच हा मान मिळतो असे सिंह यांनी स्पष्ट केले. तुम्ही देशाचा सन्मान वाढविला आहे. त्यासाठी माझ्याकडे शब्द नाही, फक्त भावना असल्याचे ते म्हणाले.
2 ऑक्टोबर 2024 ला अॅडमिरल दिनेश त्रिपाठी यांनी गोव्यात बावटा दाखविल्यावर सुरू झालेली ही नाविक सागरी परिक्रमा दोन मध्ये रुपा ए व दिलना के यांनी आठ महिन्यांत सुमारे 23400 सागरी मैलपेक्षा जास्त अंतर कापले आहे. त्यांनी मेक इन इंडिया व आत्मनिर्भर भारत उपक्रमांचे एक प्रतीक असलेल्या तारिणी बोटीतून ही परिक्रमा पूर्ण केली. पंचवीस फुटांपेक्षा जास्त उंचीच्या महाकाय लाटा, प्रचंड वेगाने वाहणारे वारे आणि हाडे गोठवणारी थंडी, 40 अंशाचे कडक ऊन अशा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिडाच्या बोटीचा तब्बल 43 हजार किलोमीटरचा आठ महिन्यांचा प्रवास दोघींनी केला.
होय, आम्ही ते साध्य व सिध्द केले असा शब्दांत रुपा ए आणि दिलना के यांनी आपले मनोगत व्यक्त केले. आशा व धैर्याच्या जोरावर आम्ही ही कामगिरी केली. सागरात आम्ही राष्ट्रध्वज, नौदलाचा ध्वज दिमाखाने फडकाविला. कोणत्याही आव्हानाला शेवट नसतो. आम्ही सागरात प्रत्येक गोष्टींचा सामना करून भारतीय नारी काय करू शकते हे दाखवून दिले आहे. यापासून इतरांना नक्कीच प्रेरणा मिळेल, असे त्या म्हणाल्या.
अॅडमिरल दिनेश त्रिपाठी यांनी आजचा दिवस देशासाठी व नौदलासाठी प्रेरणा दिवस असल्याचे सांगितले. लेफ्ट. कमांडर रूपा ए., दिलना के या दोघींनी साहस, संकल्प व इच्छाशक्तीचे रूप दाखविले आहे. काही ठिकाणी निर्जन असलेल्या समुद्रातून प्रवास करून त्यांनी एक विक्रम केला आहे. त्यांच्या कामगिरीतून युवक व मुलींना प्रेरणा मिळेल.