पणजी : देशातील पहिल्या ‘कर्व्ह (वक्र ) केबल-स्टेड’ पुलासह चौपदरी रस्त्याचे मंगळवारी लोकार्पण होत आहे. केंद्रीय रस्ते विकास आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते वास्को येथे हा रस्ता जनतेसाठी खुला करण्यात येणार आहे. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह मंत्रिमंडळातील मंत्री, आमदार उपस्थित असतील.
रवींद्र भवन ते एमपीए गेट क्रमांक 9 पर्यंत 2.32 किलोमीटर लांबीच्या लूप-2 चे हे लोकार्पण होत आहे. या प्रकल्पामध्ये तीन आरओबी (रोड ओव्हर ब्रिज) असलेली उन्नत रचना समाविष्ट आहेत. त्यापैकी आरओबी 2 केबल-स्टेड ब्रिज असून हा भारतातील पहिला वक्र पूल आहे, जो तिसर्या स्तरावर आहे. पहिल्या स्तरामध्ये थेट रेल्वे ट्रॅक, दुसरा स्तर सध्याचा आरओबी आहे आणि तिसरा स्तर आरओबी 2 आहे. लूप-2 मध्ये वास्को सिटी येथे डाऊन रॅम्प आणि अप रॅम्पचा समावेश आहे. या पुलाच्या तोरणांमधील स्टील हे गंज, संरचनात्मक विस्थापन आहे. पुलावरून जाणार्या जड भारासाठी लोड सेल रीडिंगचा वापर करण्यात आला आहे.
पुलाला डायनॅमिक सिग्नेचर लाइटिंग जी आधुनिक स्पार्कलिंग इफेक्टसह प्रदान करण्यात आली आहे. पायलॉनवरील प्रोजेक्टर इमेज डिस्प्ले वास्को सिटीला अद्वितीय रंगांनी सुशोभित करेल. या प्रकल्पासाठी एकूण 644 कोटी रुपये इतका खर्च आला आहे. 14 ऑक्टोबर 2015 रोजी या कामाला सुरुवात झाली होती. या प्रकल्पातील वरुणापुरी ते सडा जंक्शन (लूप-1) आणि रवींद्र भवन जंक्शन ते मुरगाव या बंदर जोडणीच्या चौपदरी रस्त्याचे बांधकाम या प्रकल्पात येत असून राष्ट्रीय महामार्ग 566 मुरगाव बंदर प्राधिकरण गेट क्रमांक 9 (लूप-2) ते वरुणापुरी, सडा जंक्शन (लूप-1) 5.20 किलोमीटर लांबीचा बंदर जोडणी रस्ता 3 जानेवारी 2022 रोजी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.