Goa Fish Market Rates  Pudhari File Photo
गोवा

Illegal Fish Market | बेकायदा बाजारात कुजलेल्या मासळीची विक्री

Illegal Fish Market | मडगावात परप्रांतीयांकडून प्रकार; आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष

पुढारी वृत्तसेवा

मडगाव : पुढारी वृत्तसेवा

फॉर्मलीनयुक्त मासळीचा मुद्दा अजूनही नागरिकांच्या स्मरणातून गेलेला नाही. त्या प्रकरणामुळे निर्माण झालेली भीती आणि संताप शांत होण्याआधीच मडगाव परिसरात आणखी एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. परप्रांतीय विक्रेत्यांकडून कुजकी, दुर्गंधीयुक्त आणि आरोग्यास गंभीर धोका निर्माण करणारी मासळी सर्रासपणे विक्रीस ठेवली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे.

हा प्रकार थेट नागरिकांच्या जीवाशी खेळ करणारा ठरत आहे. मडगावच्या घाऊक मासळी बाजाराशेजारील सुरावली पूल परिसरात बेकायदेशीरपणे मासळी बाजार थाटण्यात आला आहे. येथे ताज्या मासळीत कुजकी मासळी मिसळून ती 'ताजी' म्हणून ग्राहकांच्या माथी मारली जात असल्याचे वास्तव उघड झाले आहे.

सकाळपासून संध्याकाळपर्यंत सुरू असलेल्या या विक्रीकडे प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना आहे. माडेल येथील घाऊक मासळी बाजार आधीच वादाच्या भोवऱ्यात सापडलेला असताना दोन गटांतील वर्चस्वाच्या संघर्षामुळे परिस्थिती अधिकच बिघडली आहे.

परराज्यातून येणाऱ्या मासळीचे दर बाहेरील कंत्राटदार ठरवत असून, बाजारावर कोणतेही ठोस नियंत्रण राहिलेले नाही. या गोंधळाचा फायदा घेत काही परप्रांतीय विक्रेते सडलेली मासळी स्वस्तात आणून जादा नफ्यासाठी तिची विक्री करत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.

फातोर्डा येथील सामाजिक कार्यकर्त्या मिलाग्रीस फर्नाडिस यांनी पत्रकारांसह या ठिकाणी पाहणी केली असता अत्यंत अस्वच्छ आणि धक्कादायक दृश्य दिसून आले. दोन ते तीन दिवसांची मासळी वर्षाशिवाय उघड्यावर ठेवली जात असल्याचे, उरलेली मासळी प्लास्टिकने झाकून रात्रभर तशीच साठवली जात असल्याचे आणि दुसऱ्या दिवशी तीच मासळी ताज्या मासळीत मिसळून विक्रीस काढली जात असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.

एवढेच नव्हे तर साळ नदीचे प्रदूषित पाणी वापरून मासळी धुतली जात असल्याची माहितीही समोर आली आहे.

राजकीय आशीर्वाद ?

फॉर्मलीन प्रकरणानंतरही अन्न व औषध प्रशासनाने या प्रकाराकडे दुर्लक्ष केल्याची टीका होत आहे. गेल्या वर्षभरापासून हा बेकायदेशीर बाजार सुरू असल्याचे स्थानिकांचे म्हणणे असून, तरीही कारवाई न झाल्याने राजकीय आशीर्वादाशिवाय हा व्यवसाय सुरू राहू शकत नाही, अशी चर्चा रंगू लागली आहे.

दोषींवर कारवाई

करण्याची मागणी लोकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या या बेकायदेशीर मासळी विक्रीवर तातडीने छापा टाकून दोषींवर कठोर कारवाई करावी; अन्यथा जनआंदोलन उभारण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे. प्रशासनाने आता तरी जागे होऊन या गंभीर प्रकाराची सखोल चौकशी करून जबाबदारांवर गुन्हे दाखल करावेत, अशी ठाम मागणी होत आहे.

आरोग्याचा प्रश्न

बर्फाशिवाय मासळी ताजी राहणे अशक्य असताना प्रदूषित पाण्यात ठेवलेली मासळी दुसऱ्या दिवशी नागरिकांच्या ताटात पोहोचत असल्याने अन्नविषबाधा, संसर्गजन्य आजार आणि इतर गंभीर आरोग्य समस्या उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. साळ नदीचे पाणी पिण्यायोग्य नसल्याचा अहवाल यापूर्वीच प्रसिद्ध झाला असूनही त्याच पाण्याचा वापर केला जात असल्याने प्रशासनाच्या निष्क्रियतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT