मडगाव : रुमडामळ हाउसिंग बोर्ड परिसरात बेकायदा सुरू असलेल्या मदरशावर मायणा-कुडतरी पोलिसांनी सोमवारी रात्री कारवाई केली. या कारवाईत गोवा, कर्नाटक आणि बिहारमधून आणलेल्या १७मुलांची सुटका करण्यात आली.
विशेष म्हणजे या मुलांकडे आधारकार्ड किंवा कोणतेही ओळखपत्र नव्हते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंजुमन हायस्कूलमागील निळ्या रंगाच्या इमारतीत हा मदरसा चालू होता. मात्र, यासाठी कोणतीही शासकीय परवानगी घेण्यात आलेली नव्हती.
स्थानिकांनी येथे संशयास्पद हालचाली सुरू असल्याची तक्रार पोलिसांकडे केली होती. त्यानंतर पोलिसांनी रात्रीच्या सुमारास या ठिकाणी छापा टाकून पाहणी केली असता मदरशात एकूण १७ मुले आढळली. पोलिसांनी तत्काळ मुलांच्या सुरक्षिततेसाठी बालकल्याण समितीशी संपर्क साधला. मुलांवर मानसिक आघात होऊ नये म्हणून त्यांना त्या रात्री त्याच ठिकाणी ठेवण्यात आले. पोलिस तपासात या मुलांकडे कोणतीही अधिकृत कागदपत्रे नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या मुलांची खरी ओळख पटवण्याचे काम सध्या सुरू आहे.
संबंधित मदरसा पूर्वी इतर ठिकाणी चालू होता, मात्र स्थानिकांच्या विरोधानंतर त्याचे ठिकाण बदलण्यात आले. या प्रकरणाचा पोलिस तपास करत असून दोषींवर कारवाई होणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.