पणजी ः राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय चित्रपट क्षेत्रातील कलाकार, दिग्दर्शक, देशी-विदेशी पर्यटक, दिग्गज मान्यवरांच्या विशेष उपस्थितीत राजधानी पणजीत गुरुवारी इफ्फीचे शानदार उद्घाटन करण्यात आले. साक्षात चंदेरीनगरी अवतरल्याचा भास निर्माण झाला होता. त्यामुळे लाईटस्, कॅमेरा, ॲक्शन... एवढेच म्हणणे बाकी होते. रस्त्याच्या दुतर्फा आकर्षक चित्ररथ पाहण्यासाठी पर्यटक व चित्रपट रसिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. त्यामुळे पणजीसह पूर्ण परिसर इफ्फीमय झाला होता.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व मान्यवरांंनी तुळशीच्या रोपट्यास जल अर्पण करून इफ्फीचे उद्घाटन केले. उद्घाटन सोहळ्यास राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू, केंद्रीय माहिती व प्रसारण राज्यमंत्री डॉ. मुरुगन, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, चित्रपट अभिनेते अनुपम खेर, नंदमुरी बालकृष्ण, महोत्सव संचालक दिग्दर्शक शेखर कपूर, खासदार सदानंद शेट तानावडे, भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, इएसजीच्या उपाध्यक्ष आमदार डिलायला लोबो, माहिती व प्रसारण खात्याचे सचिव संजय जाजू व विविध देशांतील चित्रपट दिग्दर्शक व कलाकार उपस्थित होते. उद्घाटन सोहळ्यात तेलगु चित्रपट अभिनेते नंदमुरी बालकृष्ण यांना चित्रपट क्षेत्रांत 50 वर्षे झाल्याबद्दल मुख्यमंत्री व राज्यपालांच्या हस्ते त्यांचा विशेष गौरव करण्यात आला.