पणजीः गोवा सुंदर आहे. आंतरराष्ट्रिय पर्यटनाचे आकर्षणाचे स्थान आहे.गोवा सर्जनशिलतेचे सुंदर ठीकाण आहे. भरीव पायाभूत सुविधा सरकारने उपलब्ध केल्या आहेत. चित्रपटांच्या शुटींगसाठी येथे आकर्षक स्थळे आहेत, वातावरण आहे, त्यामुळे जगभरातील चित्रपट निर्मात्यांनी गोव्याला चित्रपट निर्मितींचे केंद्र बनवावे, सरकार शक्यते सर्व सहकार्य करेल. असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांनी केले.
पणजी येथे आज गुरुवारी 56 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या उदघाटन सोहळ्यात डॉ. सावंत बोलत होते. यावेळी राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू, केंद्रीय माहिती व प्रसारण राज्यमंत्री डॉ. मुगुरुन, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, चित्रपट अभिनेते अनुपम खेर, नंदपुरी बालकृष्णन, महोत्सव संचालक दिग्दर्शक शेखर कपूर, खासदार सदानंद शेट तानावडे, भाजपचे प्रदेश अध्यक्ष दामू नाईक, ईएसजीच्या उपाध्यक्ष आमदार डिलायला लोबो, माहिती व प्रसारण खात्याचे सचिव संजय जाजू व विविध देशातील चित्रपट दिग्दर्शक व कलाकार उपस्थित होते.
पुढे बोलताना डॉ. सावंत म्हणाले की गोवा नेहमीच सेलिब्रिटी आणि सर्जनशीलतेवर विश्वास ठेवतो. चित्रपट हा कथा सांगणारे माध्यम आहे. गोवा बदलला तसा ईफ्फी बदलत आहे.जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा गोव्यात तयार झाल्या आहेत. पर्यटन आणि आतिथ्य उद्योग स्वागतासाठी आम्ही नेहमीच सज्ज आहोत. या वर्षी गोवा राज्यातील संस्कृती, सर्जनशीलता, सौंदर्य आणि कार्यक्षमता दर्शविणारा उदघाटन सोहळा होत आहे. यंदा जपान फोकस देश आहे, भारत व जपानमध्ये सांस्कृतिक व आध्यात्मिक संबंध. आहेत. असे सांगून गोव्याच चित्रपट निरर्मितीसाठी सरकारद्वारे केल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीची माहिती डॉ. सावंत यांनी दिली.
ईफ्फी सर्जनशील अदला बदलाचे व्यासपीठ - राज्यपाल
ईफ्फी सर्जनशिल अदला बदलाचे व्यासपीठ असून जगभरातील चित्रपट रसिक व निर्माते व दिग्दर्शकांना नवे काहीतरी देणारा सोहळा आहे. असे प्रतिपादन राज्यपाल गजपती राजू यांनी केले. गोव्याने या प्रतिष्ठित महोत्सवाचे आयोजन करण्याचे हे सलग 20 वे वर्ष आहे. या महोत्सवात 84 देशांमधून 270 चित्रपट एकत्र आलेत. समृद्ध, जागतिक चित्रपट, भारतीय चित्रपट आणि उदयोन्मुख प्रतिभेचे मिश्रण करणारे हे चित्रपट आहेत. मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत आणि त्यांचे नेतृत्व एक उत्साही आणि स्वागतार्ह आहे. आपले त्यावेळचे केंद्रीय मंत्री मंडळातील सहकारी मनोहर पर्रीकर यांनी ईफ्फी गोव्यात आणला त्यामुळे त्यांची आठवण यावेळा येणे साहजिकच आहे. असे राज्यपाल म्हणाले.
पर्रीकरामुळे गोवा ईफ्फीचे कायम केंद्र - मुरुगन
माजी मुख्यमंत्री व माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांच्यामुळे गोवा ईफ्फीचे कायमस्वरुपी केंद्र बणले. असे केंद्रिय माहिती मंत्री एल मुरुगन म्हणाले. केंद्रिय माहिती व प्रसारण मंत्री अश्वीन वैष्णव व गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यामुळे यंदा ईफ्फीचा उदघाटन सोहळा खुल्या जागेत व पारंपारिक संस्कृती दर्शवणाऱ्या चित्ररथाद्वारे होत असल्याचे सांगून वंदे मातरमला 150 वर्षे होत असल्याने त्याची झलक लोकनृत्यूतून दिसेल असे मुरुगन म्हणाले. उदघाटन सोहळ्यात तेलगु चित्रपट अभिनेते नंदमुरी बालकृष्णन यांना चित्रपट क्षेत्रात 50 वर्षे झाल्याबद्दल मुख्यमंत्री व राज्यपालांच्या हस्ते त्यांचा विशेष गौरव करण्यात आला.