पणजी : ५७ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवास (इफ्फी) २०२६ला शुक्रवारी (दि. २०) रंगारंग आणि दिमाखदार सोहळ्याने सुरुवात झाली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते दीपप्रज्वलानाने सोहळ्याचे उद्घाटन करण्यात आले.
ताळगाव पठारावरील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियममध्ये आयोजित या सोहळ्याच्या उद्घाटन प्रसंगी व्यासपीठावर खासदार रवी किशन, खासदार सदानंद तानावडे, केंद्रीय माहिती आणि प्रसारण खात्याचे सचिव चंचल कुमार, महोत्सव संचालक आशुतोष गोवारीकर, गोवा मनोरंजन संस्थेच्या उपाध्यक्षा आमदार डिलायला लोबो, इएसजी मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक बांदेकर, एनएफडीसीचे संचालक जी. कृष्णकुमार, मुख्य सचिव डॉ. व्ही. कांडावेलू, प्रसून जोशी उपस्थित होते.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, यंदाच्या इप्फीची संकल्पना 'स्टोरी विदाउट बॉर्डर्स' (सीमापार कथा) अशी असून, 'वसुधैव कुटुंबकम' या भारतीय तत्त्वज्ञानाशी ती सुसंगत आहे. चित्रपटांमुळे विविध संस्कृतींचा अनुभव घेता येतो आणि लोकांना एकत्र जोडता येते. गेली २२ वर्षे गोवा हे 'इफ्फी'चे ठिकाण राहिले असून, हा महोत्सव गोव्याच्या सांस्कृतिक दिनदर्शिकेचा अविभाज्य भाग बनला आहे.
गोवा चित्रिकरण कायदा (२०२१) आणि ऑनलाईन सिंगल विंडो क्लिअरन्स यंत्रणेद्वारे परवानग्यांची प्रक्रिया अधिक सोपी केली जात आहे. तसेच, फिचर आणि नॉन-फिचर चित्रपटांसाठी आर्थिक सहाय्य योजना राबविल्या जात असून, डिजिटल आणि नवीन माध्यमांसाठीही योजना अद्ययावत केल्या जात आहेत. गोव्यामध्ये प्री-प्रॉडक्शन, पोस्ट-प्रॉडक्शन, व्हिज्युअल इफेक्ट्स आणि फिल्म एज्युकेशन यांसारख्या सुविधांसह 'फिल्म सिटी' उभारण्याचा प्रस्ताव आहे. 'वेव्हज फिल्म बझार', 'क्रिएटिव्ह माईंड्स ऑफ टुमॉरो', कार्यशाळा आणि मास्टरक्लासेसद्वारे नवोदित कलाकारांना जागतिक संधी उपलब्ध करून दिल्या जात आहेत. तसेच, 'इफ्फी परेड' आणि पर्वरी, मडगाव व फोंडा येथे खुल्या हवेत (ओपन एअर) चित्रपट दाखवण्याचे नियोजन आहे.
या महोत्सवात ८६ देशांतील १५४ आंतरराष्ट्रीय चित्रपट आणि ७५ भारतीय चित्रपट दाखवले जाणार आहेत. स्पेन हा 'कंट्री ऑफ ऑनर' (सन्माननीय देश) तर रशिया हा 'पार्टनर कंट्री' (भागीदार देश) आहे. महोत्सवात 'ब्रिक्स सिनेमा फोकस' अंतर्गत २१ राष्ट्रांतील चित्रपटांचा समावेश करण्यात आला आहे.जगभरातील १४०० हून अधिक प्रवेशिकांमधून ८६ देशांतील १५९ चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये ९ जागतिक प्रीमियर्स, २ आंतरराष्ट्रीय प्रीमियर्स, २४ आशियाई प्रीमियर्स आणि ११६ भारतीय प्रीमियर्सचा समावेश आहे. महोत्सवाची सुरुवात पावेल पावलिकोव्स्की दिग्दर्शित फादरलँड’ या चित्रपटाने होत आहे.
मध्यवर्ती चित्रपट म्हणून रोमानिया, जर्मनी आणि बेल्जियममधील एलिना सर्व्हे यांचा आय मॅटर, तर समारोपाचा चित्रपट म्हणून सिंगापूरच्या अँथनी चेन यांचा ‘वी आर ऑल स्ट्रेंजर्स’ दाखवला जाणार आहे.ब्रिक्स चित्रपटांची सुरुवात २२ नोव्हेंबर रोजी रामायण या चित्रपटाने होईल, असे फेस्टिव्हल डिरेक्टर आशुतोष गोवारीकर यांनी सांगितले.
जग पूर्वीपेक्षा अधिक जोडलेले : गोवारीकर
महोत्सव संचालक आशुतोष गोवारीकर म्हणाले की, आज आपण अशा काळात जगत आहोत, जिथे जग पूर्वीपेक्षा अधिक जोडले गेले आहे. मात्र, त्याच वेळी आपला परिघ, भाषा, डिजिटल माध्यमे आणि विचारांच्या चौकटीत राहणेही अधिक सोपे झाले आहे. आजच्या काळात सीमा केवळ नकाशावरील रेषांपुरत्या मर्यादित राहिलेल्या नाहीत, तर त्या आपल्या सवयींचाही भाग बनल्या आहेत. अशा सीमा पारपत्राशिवाय ओलांडण्याची ताकद कथांमध्ये आहे.
जेव्हा एखादी व्यक्ती दुसऱ्या देशातील, आपल्याला समजत नसलेल्या भाषेतील चित्रपट पाहते आणि तरीही त्यातील पात्रांच्या भावना अनुभवते, तेव्हा एक महत्त्वाची गोष्ट घडते माणसांमधील अंतर कमी होते. चित्रपटांचे हेच सर्वात मोठे सामर्थ्य आहे. याच विचारातून यावर्षीच्या इप्फीची संकल्पना सीमांच्या पलीकडील कथा' आहे.