पणजी : गोव्यात आयोजित करण्यात येणारा यंदाचा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) सर्वोत्तम व्हावा, यासाठी आयोजक म्हणून आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत, असे प्रतिपादन इफ्फीचे महोत्सव संचालक आणि प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांनी केले.
शुक्रवारी दुपारी पणजी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी केंद्रीय चित्रपट संचालनालयाचे अधिकारी धीरज सिंग आणि पत्र सूचना कार्यालयाच्या (पीआयबी) अधिकारी स्मिता शर्मा उपस्थित होते. याप्रसंगी गोवारीकर आणि अन्य मान्यवरांच्या हस्ते इफ्फीच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले.
गोवारीकर म्हणाले की, यंदाच्या इफ्फीच्या संपूर्ण कालावधीत आपण उपस्थित राहणार आहोत. यंदाच्या महोत्सवात जुन्या आणि दर्जेदार चित्रपटांनाही स्थान देण्यात आले आहे. ‘सीमांशिवाय कथा’ (स्टोरीज विदाऊट बॉर्डर्स) हे यंदाच्या इफ्फीचे घोषवाक्य असून, त्याच संकल्पनेला अनुसरून चित्रपटांची निवड करण्यात आली आहे.
यंदाच्या महोत्सवात ॲनिमेशन, माहितीपट (डॉक्युमेंटरी) आणि मिशन लाइफ असे तीन स्वतंत्र विभाग समाविष्ट करण्यात आले आहेत. पत्रकारांनी देशी आणि विदेशी चित्रपट आवर्जून पाहावेत आणि त्याविषयी आपली मते मांडावीत, असे आवाहनही गोवारीकर यांनी केले. यंदाच्या चित्रपट महोत्सवाची सर्व तयारी पूर्ण झाली असून, आजच्या उद्घाटन सोहळ्यानंतर शनिवार, दि.२१ रोजी पासून रसिकांना दर्जेदार चित्रपटांचा आस्वाद घेता येणार आहे. रसिकांच्या पसंतीस उतरतील अशा जगभरातील उत्तम चित्रपटांची निवड करण्यात आली आहे, असेही गोवारीकर यांनी सांगितले.