पत्रकार परिषदेत बोलताना भास्कर विश्वनाथन. बाजूला इतर. 
गोवा

The Unseen Holy River Saraswati | रहस्य उलगडणारा 'द अनसीन होली रिव्हर-सरस्वती'

भास्कर विश्वनाथन: व्यापक संशोधन मनोरंजक पद्धतीने मांडणे आव्हानात्मक

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा

पृथ्वीच्या पोटात लपलेली, प्राचीन ग्रंथांच्या पानांतून वाहणारी आणि भारताच्या संस्कृतीच्या स्मृतीत रुजलेली सरस्वती नदी हे देशातील कायमचे एक गूढ राहिले आहे. प्राचीन परंपरा आणि आधुनिक वैज्ञानिक संशोधन यांच्यातील दरी भरून काढण्याचा प्रयत्न करणारा हिंदी माहितीपट 'द अनसीन होली रिव्हर -सरस्वती' ५७ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) २०२६ च्या इंडियन पॅनोरमा विभागात दाखविला जात आहे.

या माहितीपटात नदीची रंजक कथा आणि डॉ. सुभाष सी. सिंग यांनी तिच्या अस्तित्वाबाबत केलेल्या वैज्ञानिक तपासाची मांडणी करण्यात आली आहे. प्राचीन भौगोलिक संदर्भ, भूगर्भीय निरीक्षणे आणि वैज्ञानिक संशोधन यांचा एकत्रित वापर करून भारताच्या नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारशाचा वेध यात घेण्यात आला आहे. दिग्दर्शक भास्कर विश्वनाथन यांनी आपला पहिला माहितीपट बनवतानाचा अनुभव सांगितला.

सरस्वती नदीभोवतीचे रहस्य आपल्यालाही तितकेच आकर्षित करणारे होते आणि या विषयावरील संशोधन हेच प्रेरणेचा मोठा स्रोत ठरल्याचे ते म्हणाले. सरस्वतीचे ऐतिहासिक आणि महत्त्व, सांस्कृतिक विशेषतः संस्कृतीशी आणि प्राचीन वैदिक परंपरेशी असलेला तिचा संबंध त्यांनी अधोरेखित केला. वेदांची रचना तिच्या काठावर झाली असे मानले जाते, असे त्यांनी सांगितले.

कुंभमेळ्यातून सुचली कल्पना : जैन

निर्मात अभिनव एम. जैन यांनी सांगितले की, भारताच्या नद्या आणि त्यांचे ऐतिहासिक महत्त्व याबद्दलच्या कुतूहलातून या चित्रपटाची निर्मिती करण्याची प्रेरणा मिळाली. प्रयागराज येथील कुंभमेळ्याला भेट दिली असता त्रिवेणी संगमावर त्यांना फक्त गंगा आणि यमुना दिसल्या. त्यामुळे वेद आणि इतर हिंदू धर्मग्रंथांमध्ये वारंवार उल्लेख असलेल्या तिसऱ्या नदी सरस्वतीबद्दल शोध घेण्याची प्रेरणा मिळाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT