IFFI 2026 
गोवा

IFFI 2026 | 1975 पासून आजपर्यंत इफ्फीचा प्रवास जवळून पाहणाऱ्या चित्रपटप्रेमीची कहाणी

IFFI 2026 | आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा (इफ्फी) प्रवास म्हणजे केवळ चित्रपटांचा उत्सव नसून, बदलत्या चित्रपट संस्कृतीचा आणि भारतीय चित्रपटसृष्टीच्या वाटचालीचा इतिहास आहे.

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा (इफ्फी) प्रवास म्हणजे केवळ चित्रपटांचा उत्सव नसून, बदलत्या चित्रपट संस्कृतीचा आणि भारतीय चित्रपटसृष्टीच्या वाटचालीचा इतिहास आहे. १९७५ पासून इफ्फीचे साक्षीदार असलेले चित्रपटप्रेमी सतिंदर मोहन यांनी आतापर्यंत ४३ इफ्फीमध्ये नियमित सहभाग घेतला असून, ५७ वा इफ्फी हा त्यांचा ४४ वा महोत्सव आहे. चित्रपटांची आवड, आंतरराष्ट्रीय चित्रपटांचा अभ्यास, ज्युरी सदस्य म्हणून काम आणि इफ्फीच्या बदलत्या स्वरूपाचा जवळून घेतलेला अनुभव अशा अनेक पैलूंमधून त्यांनी या महोत्सवाची वाटचाल अनुभवली आहे. इफ्फीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी साधलेला हा संवाद.

प्र. चित्रपटांबद्दलची तुमची आवड कशी विकसित झाली?

उ. मी समकालीन आंतरराष्ट्रीय आणि भारतीय चित्रपटसृष्टीचा चाहता आहे. १९७९ मध्ये दिल्लीतील एका फिल्म सोसायटीचा सदस्य झालो. तेथे दर महिन्याला चार ते पाच कलात्मक, समकालीन आणि पुरस्कारप्राप्त चित्रपट दाखवले जात. त्यामुळे बर्गमन, अकिरा कुरोसावा, फासबेंडर, कार्लोस सौरा, तारकोवस्की, मार्टिन स्कॉर्सेसी यांसारख्या आंतरराष्ट्रीय दिग्दर्शकांचे चित्रपट पाहता आले. तसेच सत्यजित रे, मृणाल सेन, अदूर गोपालकृष्णन, गौतम घोष, ऋत्विक घटक, श्याम बेनेगल यांच्या कलाकृतींचाही परिचय झाला.

प्र. इफ्फीशी तुमचा प्रवास कधी सुरू झाला?

उ. १९७५ मध्ये नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे झालेल्या पाचव्या इफ्फीला मी प्रथम चित्रपटप्रेमी म्हणून उपस्थित राहिलो. याच वर्षी इफ्फीने मोर हे बोधचिन्ह स्वीकारले. १९८२ मध्ये नव्याने बांधलेल्या सिरीफोर्ट सभागृहात झालेल्या नवव्या इफ्फीमध्ये पहिल्यांदा प्रतिनिधी म्हणून सहभागी झालो. तेव्हापासून एकही खंड न पडता देशातील इफ्फीला उपस्थित राहिलो आहे. आतापर्यंत ४३ इफ्फीमध्ये सहभागी झालो असून, ५७ वा इफ्फी हा माझा ४४ वा महोत्सव आहे.

प्र. ज्युरी किंवा पूर्वावलोकन समितीवर काम केले आहे का?

उ. २०१६ आणि २०२० मध्ये इंडियन पॅनोरमा फीचर फिल्म ज्युरीचा सदस्य म्हणून काम केले. २००९ ते २०२१ या काळात इफ्फीच्या आठ आवृत्त्यांमध्ये पूर्वावलोकन समितीचा सदस्य होतो. २०२३ मध्ये मुंबईत झालेल्या पहिल्या शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन चित्रपट महोत्सवाच्या पूर्वावलोकन समितीवरही काम केले. याशिवाय जागरण फिल्म फेस्टिव्हलच्या पूर्वावलोकन समितीचा सदस्य आहे.

प्र. इफ्फीमध्ये काळानुसार कोणते बदल झाले?

उ. इफ्फीचा प्रवास मोठा आहे. सुरुवातीला महोत्सव १५ दिवसांचा असायचा. १९९० मध्ये कालावधी ११ दिवसांचा करण्यात आला. २००४ मध्ये इफ्फी गोव्यात आला. २०१६ पासून महोत्सवाचा कालावधी नऊ दिवसांचा झाला.

स्पर्धा विभागातही अनेक बदल झाले. सुरुवातीला गोल्डन आणि सिल्व्हर पीकॉक पुरस्कार दिले जात. १९८९ मध्ये स्पर्धा विभाग बंद झाला. १९९६ मध्ये आशियाई महिला दिग्दर्शकांच्या स्पर्धेद्वारे तो पुन्हा सुरू झाला. २०१० मध्ये ४१ व्या इफ्फीपासून स्पर्धा जगभरातील चित्रपटांसाठी खुली झाली. त्यात सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि अभिनेत्री पुरस्कारांचाही समावेश झाला.

प्र. इफ्फीचे गोवा कायमस्वरूपी आयोजनस्थळ झाल्यानंतर महत्त्वाचे बदल झाले?

उ. तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी प्रयत्न करून २००४ मध्ये इफ्फी गोव्यात आणला. २०१४ मध्ये गोव्याला कायमस्वरूपी आयोजनस्थळ घोषित करण्यात आले. त्यानंतर फेलिनी पदक, गांधी पदक, 'फर्स्ट कट', '७५ क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमॉरो' असे उपक्रम सुरू झाले. २०२१ मध्ये लाइफटाइम अचिव्हमेंट पुरस्काराचे नाव बदलून सत्यजित रे लाइफटाइम अचिव्हमेंट पुरस्कार करण्यात आले. गेल्या वर्षी प्रथमच एआय चित्रपटांचे प्रदर्शन झाले

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT