Marathi Film Tighi 
गोवा

Marathi Film Tighi | इफ्फी 2026 मध्ये मराठी चित्रपटांचा डंका! 'सिनेमॅन' आणि 'तिघी'ची विशेष निवड

Marathi Film Tighi | महाराष्ट्राची चित्रपटसृष्टी जागतिक स्तरावर पोहोचणार; इफ्फीतील सहभाग ठरणार महत्त्वाचा

पुढारी वृत्तसेवा

पणजी : प्रभाकर धुरी

महाराष्ट्रातील चित्रपट निर्मिती, सांस्कृतिक वैविध्य आणि चित्रीकरणासाठी उपलब्ध पायाभूत सुविधांचे सामर्थ्य राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अधोरेखित करण्यासाठी महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ यंदाही गोव्यात आयोजित ५७ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) सहभागी होत आहे. महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली यंदा महामंडळाच्या वतीने 'सिनेमॅन' आणि 'तिघी' या दोन मराठी चित्रपटांची निवड करण्यात आली आहे.

महामंडळासह एन. डी. स्टुडिओ आणि कोल्हापूर चित्रनगरीचे विशेष दालनही महोत्सवात उभारण्यात येणार आहे. जगभरातील चित्रपट आणि चित्रपट निर्मितीतील नवे प्रवाह एकत्र आणणारा 'इफ्फी महोत्सव' गोव्यात होत आहे. २०१५ पासून महामंडळ या महोत्सवात सहभागी होत असून, दरवर्षी उत्कृष्ट मराठी चित्रपटांची 'व्हेव्हज् फिल्म बझार' या विभागात प्रदर्शनासाठी निवड केली जाते. यंदा दोन वेगळ्या आशयांचे मराठी चित्रपट सादर करण्यात येणार आहेत.

त्यात उमेश मोहन बागडे दिग्दर्शित 'सिनेमॅन' आणि जिजीविषा काळे दिग्दर्शित 'तिघी' या चित्रपटांचा समावेश आहे. 'सिनेमॅन' हा चित्रपट दुर्गम भागातील शालेय विद्यार्थ्यांपर्यंत अर्थपूर्ण चित्रपट पोहोचविण्याचा ध्यास घेतलेल्या आनंद या निवृत्त शिक्षकाच्या प्रेरणादायी कार्याभोवती फिरतो. चित्रपटांच्या माध्यमातून मुलांमध्ये चित्रपटविषयक जाणिवा निर्माण करण्यासाठी त्यांनी सुरू केलेल्या उपक्रमाचा मागोवा एका तरुण चित्रपटकर्मीकडून घेतला जातो.

या प्रवासात मुलांची कल्पनाशक्ती, बालविश्व आणि जागतिक सिनेमाशी जोडणारा रंजक कथानुभव उलगडतो. चित्रपट माध्यमाची ताकद आणि समाजातील त्याचे शैक्षणिक व सांस्कृतिक महत्त्व अधोरेखित करणारा हा चित्रपट आहे. 'तिघी' हा चित्रपट आई आणि तिच्या दोन मुली यांच्यातील गुंतागुंतीच्या नात्यांचा भावनिक वेध घेतो. आईच्या आजारपणामुळे अनेक वर्षांपासून दुरावलेल्या दोन बहिणी पुन्हा एकत्र येतात. त्यातून जुन्या आठवणी, मनातील सल, नात्यांमधील ताणतणाव आणि कुटुंबात दडलेली रहस्ये समोर येतात.

जिजीविषा काळे दिग्दर्शित या चित्रपटात भारती आचरेकर, नेहा पेंडसे आणि सोनाली कुलकर्णी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. मानवी नातेसंबंध, स्त्रीजीवन आणि कौटुंबिक भावविश्वाचे संवेदनशील चित्रण करणारा हा चित्रपट २३ नोव्हेंबरला महोत्सवात दाखवण्यात येणार आहे.

या दोन्ही चित्रपटांच्या माध्यमातून मराठी चित्रपटसृष्टीतील आशय वैविध्य, वेगवेगळ्या विषयांकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि प्रभावी कथनाकथनाची परंपरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील प्रतिनिधींसमोर मांडण्याची संधी मिळणार आहे.

मुंबई हे भारतीय चित्रपटसृष्टीचे महत्त्वाचे केंद्र असून, राज्यातील विविध भागांतही चित्रपट निर्मितीच्या संधी विस्तारत आहेत. चित्रपटगृहांची व्यवस्था, चित्रीकरणासाठीची नैसर्गिक व बंदिस्त स्थळे, तांत्रिक मनुष्यबळ, निर्मिती पश्चात सेवा आणि स्थानिक कलावंतांची उपलब्धता या घटकांच्या आधारे महाराष्ट्रात व्यापक चित्रपट निर्मिती परिसंस्था विकसित करण्यासाठी राज्य शासनाचे प्रयत्न सुरू आहेत.

या पार्श्वभूमीवर महामंडळाचे दालन केवळ माहिती देणारे प्रदर्शन न राहता, महाराष्ट्रात चित्रीकरणासाठी आंतरराष्ट्रीय निर्मिती आणि संस्थांना आकर्षित करणारे तसेच संभाव्य सहकार्य आणि व्यावसायिक भागीदारीचे मार्ग खुले करणारे व्यासपीठ ठरणार आहे.

महाराष्ट्राचा चित्रपट निर्मिती आणि सांस्कृतिक उपक्रमांसाठी अधिक सक्षम, आकर्षक आणि जागतिक स्तरावर स्पर्धात्मक केंद्र म्हणून पुढे आणण्याच्या दृष्टीने इफ्फीतील सहभाग महत्त्वपूर्ण ठरणार आहे. महोत्सवाच्या निमित्ताने जगभरातील चित्रपट निर्मिती, चित्रपट प्रशिक्षण संस्था, तंत्रज्ञ आणि विविध देशातील प्रतिनिधी एकत्र येतात.

या संधीचा उपयोग करून महाराष्ट्रातील चित्रपट निर्मिती आणि प्रशिक्षण क्षेत्रासाठी नव्या सहकार्याच्या शक्यता तपासण्याचाही महामंडळाचा प्रयत्न असेल, अशी माहिती व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे-पाटील यांनी दिली.

महाराष्ट्राच्या चित्रपट परिसंस्थेचे विशेष दालन

महोत्सवातील महामंडळाच्या विशेष दालनातून महाराष्ट्रातील चित्रपट निर्मितीसाठी उपलब्ध पायाभूत सुविधा, चित्रपटगृहे, चित्रीकरण स्थळे, तांत्रिक सुविधा आणि निर्मितीविषयक संधींची माहिती देश-विदेशातील चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, निर्मिती संस्था आणि प्रतिनिधींना देण्यात येणार आहे.

या दालनात चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळासह एन. डी. स्टुडिओ आणि कोल्हापूर चित्रनगरी यांचाही सहभाग असेल. त्यामुळे महाराष्ट्रातील चित्रपट निर्मितीच्या विविध केंद्रांची क्षमता, तेथील सुविधा आणि निर्मात्यांसाठी उपलब्ध पर्याय एकाच व्यासपीठावर मांडता येणार आहेत.

विशेष परिसंवादातून चित्रपट क्षेत्रातील संधींचा वेध

इफ्फीच्या 'नॉलेज सीरिज' अंतर्गत २३ नोव्हेंबर रोजी महामंडळाच्या वतीने 'महाराष्ट्रातील सांस्कृतिक व चित्रपट परिसंस्था : संधी, विकास आणि शक्यता' या विषयावर विशेष परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील चित्रपट आणि सांस्कृतिक क्षेत्राची सद्यस्थिती, निर्मिती व वितरणातील बदलते प्रवाह, नव्या तंत्रज्ञानामुळे निर्माण होणाऱ्या संधी, चित्रपट निर्मितीसाठी उभारलेल्या पायाभूत सुविधा,

जागतिक बाजारपेठेतील मराठी चित्रपटांचे स्थान आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याच्या शक्यता अशा विविध पैलूंवर चर्चा होणार आहे. या परिसंवादात राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त चित्रपट दिग्दर्शक निखिल महाजन, चित्रपट निर्माते व दिग्दर्शक सुहृद गोडबोले, छायाचित्रण दिग्दर्शक व दिग्दर्शक महेश लिमये आणि सिनेअभ्यासक डॉ. संतोष पाठारे सहभागी होणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT