पणजी : दीपक जाधव
एखादी गोष्ट सांगण्यासाठी संवादांचीच गरज असते असे नाही. कधीकधी शांतताही अनेक अनुत्तरित प्रश्न उपस्थित करते. आवाज आणि शांतता यांच्यातील याच अनोख्या नात्याचा शोध घेणारा व्हिएतनामी दिग्दर्शक ले बाओ यांचा 'हिअरिंग' हा चित्रपट प्रेक्षकांसमोर एक वेगळा दृक्-श्राव्य अनुभव उभा करतो. आशय, मांडणी आणि चित्रभाषेच्या बाबतीत हा चित्रपट प्रयोगशील असला, तरी त्याची संथ गती आणि गुंतागुंतीची शैली प्रेक्षकांच्या संयमाची परीक्षा पाहते.
आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आंतरराष्ट्रीय स्पर्धेत 'हिअरिंग'चे प्रदर्शन करण्यात आले. चित्रपटाची सुरुवात एका गजबजलेल्या बारमधील गोंगाट आणि जवळच्या फुलांच्या दुकानातील शांतता यांच्या विरोधाभासातून होते. याच दृश्यातून चित्रपटाचा मूलभूत विचार स्पष्ट होऊ लागतो. आवाजाचा व्यवसाय करणारा निन्ह हा स्वतः मात्र ध्वनीहीन जगण्याशी जोडलेला आहे. आजारी आई, विभक्त झालेले वडील आणि पत्नी यांच्याशी असलेले त्याचे गुंतागुंतीचे संबंध कथेला कौटुंबिक भावविश्वाची पार्श्वभूमी देतात. निन्हच्या आयुष्यातील न बोलले गेलेले प्रश्न आणि पिढ्यान् पिढ्या चालत आलेल्या भावनिक जखमा हळूहळू उलगडत जातात.
दिग्दर्शक ले बाओ यांनी पारंपरिक कथनशैलीला फाटा देत ध्वनी आणि शांततेलाच चित्रपटातील महत्त्वाचे अभिव्यक्ति माध्यम बनवले आहे. कागदाचा आवाज, निसर्गातील सूक्ष्म ध्वनी, संगीत आणि मानवी हालचाली यांचा केलेला वापर लक्षवेधी आहे. व्हिन्सेंट व्हिला यांची ध्वनिरचना हा चित्रपटाचा सर्वांत मोठा गुणविशेष ठरतो.
छायाचित्रकार गुयेन विन्ह फुक यांनी प्रत्येक दृश्याची केलेली रचना अत्यंत देखणी आहे. प्रकाश, सावल्या, निसर्ग आणि अवकाश यांचा संयमित वापर चित्रपटाला स्वतंत्र दृश्यभाषा देतो. संपादनाच्या बाबतीत मात्र चित्रपटाला अधिक शिस्तबद्ध मांडणीची गरज जाणवते. काही प्रसंग अनावश्यकपणे लांबतात. त्यामुळे निन्हच्या व्यक्तिरेखेचा आणि त्याच्या कौटुंबिक संघर्षाचा भावनिक परिणाम अपेक्षित तीव्रतेने पोहोचत नाही.
उत्तरार्धात ध्वनी आणि दृश्यांच्या प्रयोगांना अधिक महत्त्व दिल्यामुळे मूळ आशय काहीसा मागे पडतो. शैलीच्या नादात आशयाची पकड सैल होण्याची जाणीव होते. तरीही शांततेतून मानवी नात्यांमधील दडपलेले संघर्ष, कौटुंबिक हिंसेचे चक्र आणि न बोललेल्या वेदना मांडण्याचा दिग्दर्शकाचा प्रयत्न उल्लेखनीय आहे. एकूणच, 'हिअरिंग' हा सर्वसामान्य मनोरंजनपट नाही. संथ, प्रयोगशील आणि विचारप्रवर्तक चित्रपटांचा आस्वाद घेणाऱ्या प्रेक्षकांसाठी तो एक वेगळा अनुभव ठरतो. शांततेलाही स्वतःची भाषा असते, याची जाणीव करून देणारा हा चित्रपट म्हणूनच लक्षात राहतो.