IFFI 2026 Kashmir Ladakh Films  
गोवा

IFFI 2026-इफ्फीतून उलगडणार हिमालयाचा आत्मा, काश्मीर-लडाखवरील चार चित्रपटांचे सादरीकरण

IFFI 2026 Kashmir Ladakh Films - इफ्फीतून उलगडणार हिमालयाचा आत्मा, काश्मीर-लडाखवरील चार चित्रपटांचे सादरीकरण

पुढारी वृत्तसेवा

पणजी : विठ्ठल गावडे पारवाडकर

बर्फाच्छादित हिमालयात स्वप्नांचा पाठलाग करणारा तरुण स्केटर, गुलमर्गमधील बालपणाचा संघर्ष, तसेच श्रीनगरमधील लाकडी नक्षीकामाची पारंपरिक कला जपणारे अखेरचे कारागीर अशा विविध विषयांवर आधारित चार चित्रपटांच्या माध्यमातून काश्मीर आणि लडाखचा आत्मा गोव्यापर्यंत पोहोचणार आहे. 'बिकमिंग', 'बर्ड्स ऑन आइस', 'स्लेज' आणि 'नक्श-ए-दौर' या चार चित्रपटांमधून हिमालयीन प्रदेशातील निसर्ग, संस्कृती, परंपरा आणि सामान्य माणसांच्या जीवनातील संघर्षाचे दर्शन घडणार आहे.

हिमालयीन प्रदेशातील पर्वतरांगा, प्राचीन मठ, बर्फाच्छादित गावे आणि तेथील समृद्ध हस्तकला यांचे दर्शन गोव्यात आयोजित ५७ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) घडणार आहे. लडाखी आणि काश्मिरी भाषांतील या चार चित्रपटांमध्ये दोन कथाचित्रपट आणि दोन लघुपट व माहितीपटांचा समावेश आहे. या चित्रपटांच्या माध्यमातून या प्रदेशातील निसर्गसौंदर्य, सांस्कृतिक परंपरा आणि सामान्य माणसांच्या भावविश्वाचे विविध पैलू प्रेक्षकांसमोर येणार आहेत.

लीना यादव लिखित आणि दिग्दर्शित 'बिकमिंग' हा ११ मिनिटांचा लडाखी लघुपट इंडियन पॅनोरमाच्या बिगर-वैशिष्ट्यपूर्ण चित्रपट विभागातील उद्घाटनपट म्हणून निवडण्यात आला आहे. या चित्रपटातून पुनर्जन्म, श्रद्धा, नशीब आणि भूतकाळ-वर्तमानकाळ यांच्यातील नात्याचा शोध घेण्यात आला आहे. लडाखच्या पार्श्वभूमीवर घडणारी ही कथा रिंचेन नावाची तरुण आई आणि तिचा मुलगा अज्ञाल यांच्याभोवती फिरते.

साहिल शाह दिग्दर्शित 'बर्ड्स ऑन आइस' हा ८५ मिनिटांचा लडाखी कथाचित्रपट आहे. इंडियन पॅनोरमा विभागासाठी तसेच सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शक या श्रेणीसाठी त्याची निवड झाली आहे. या चित्रपटाद्वारे साहिल शाह यांनी कथाचित्रपट दिग्दर्शक म्हणून पदार्पण केले आहे. लडाखमधील आईस हॉकी समुदायाचे जीवन हा चित्रपटाचा केंद्रबिंदू आहे. राजा शब्बीर मोहम्मद खान दिग्दर्शित 'स्लेज' हा ७५ मिनिटांचा काश्मिरी कथाचित्रपट आहे. २०२६ मध्ये या चित्रपटाचा आशियाई प्रीमियर होणार असून, इंडियन पॅनोरमा विभागात त्याचा समावेश करण्यात आला आहे भारतीय कथाचित्रपटासाठीच्य सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शक पुरस्काराच्या स्पर्धेतही हा चित्रपट आहे

'नक्श-ए-दौर' हा १२ मिनिटांच काश्मिरी माहितीपट इंडियन पॅनोरमाच्या बिगर-वैशिष्ट्यपूर्ण चित्रपट विभागात निवडण्यात आला आहे. बाबा तसदुक हुसेन यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि छायाचित्रण केले आहे श्रीनगरच्या जुन्या गल्ल्यांमध्ये अक्रोडाच्या लाकडावर नक्षीकाम करण्याची पारंपरिक काश्मिरी कल जपणारे गुलाम नबी दार हे य माहितीपटाचे केंद्रस्थानी आहेत इफ्फीच्या माध्यमातून काश्मीर आणि लडाखच्या जीवनविश्वाचा अनुभव गोव्यातील चित्रपटप्रेमींना घेता येणा-आहे.

आंतरराष्ट्रीय विभागात ८६ देशांतील १५९ चित्रपटांची निवड

पणजी : आंतरराष्ट्रीय विभागात जगभरातील १,४०० हून अधिक प्रवेशिकांमधून ८६ देशांतील १५९ चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये ९ जागतिक प्रीमियर्स, २ आंतरराष्ट्रीय प्रीमियर्स, २४ आशियाई प्रीमियर्स आणि ११६ भारतीय प्रीमियर्सचा समावेश आहे. महोत्सवाची सुरुवात पावेल पावलिकोव्स्की दिग्दर्शित फादरलँड' या चित्रपटाने होत आहे.

मध्यवर्ती चित्रपट म्हणून रोमानिया, जर्मनी आणि बेल्जियममधील एलिना सर्व्हे यांचा आय मॅटर, तर समारोपाचा चित्रपट म्हणून सिंगापूरच्या अँथनी चेन यांचा वी आर ऑल स्ट्रेंजर्स' दाखवला जाणार आहे. ब्रिक्स चित्रपटांची सुरुवात २२ नोव्हेंबर रोजी रामायण या चित्रपटाने होईल, असे फेस्टिव्हल डायरेक्टर आशुतोष गोवारीकर यांनी सांगितले.

आनंद एल. राय यांच्या नेतृत्वाखालील आंतरराष्ट्रीय ज्युरीमध्ये अर्जेंटिना, रोमानिया, कोलंबिया आणि थायलंड येथील सदस्यांचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत १५ चित्रपट आणि ५ पुरस्कारांसाठी निवड होईल. तसेच लाइनअपमधील १८ चित्रपट ऑस्करसाठी आधीच नामांकित झाले आहेत. तर इंडियन पॅनोरमामध्ये देशभरातील २५ फिचर आणि २० नॉन-फिचर चित्रपट या विभागात समाविष्ट आहेत. फिचर विभागाच्या ज्युरीचे नेतृत्व मधुर भांडारकर तर नॉन-फिचर विभागाचे नेतृत्व हिमांशू खटुआ करत आहेत. पॅनोरमाची सुरुवात हिंदीतील धुरंधर आणि लडाखी भाषेतील बिकमिंग या चित्रपटांनी होईल. गोव्यातील १५ विशेष क्युरेटेड चित्रपटांचा समावेश करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT