IFFI 2026 
गोवा

IFFI 2026 | 'इफ्फी'चा पडदा आज उघडणार!

IFFI 2026 | मुख्यमंत्री सावंत यांच्या उपस्थितीत उद्घाटन; 'सीमांपलीकडील कथा' संकल्पना

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा
देश-विदेशातील चित्रपट निर्माते, कलाकार, प्रतिनिधी आणि सिनेरसिकांच्या स्वागतासाठी गोवा सज्ज झाले असून, शुक्रवारपासून (दि. २०) ५७ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला (इफ्फी) दिमाखात प्रारंभ होत आहे. 'स्टोरीज विदाऊट बॉर्डर्स' (सीमांपलीकडील कथा) या मुख्य संकल्पनेवर आधारित हा नऊ दिवसांचा चित्रपट महाकुंभ २८ नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे.

ताळगाव येथील डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियमवर शुक्रवारी (दि. २०) सायंकाळी ४ वा. भव्य उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. ध्वनी व प्रकाश शो, राष्ट्रगीत, दीपप्रज्वलन आणि तुळशीला जलार्पण करून या सोहळ्याची सुरुवात होईल. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी, खासदार रवी किशन, महोत्सवाचे संचालक व दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर, मधुर भांडारकर आणि आनंद एल. राय यांच्यासह चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज उपस्थित राहणार आहेत.

रिकी केज यांचा 'सिम्फोनिक ऑर्केस्ट्रा' आणि सांस्कृतिक कार्यक्रम उद्घाटन सोहळ्याचे मुख्य आकर्षण पर्यावरणवादी रिकी केज यांचा 'अ वर्ल्ड ऑफ सिनेमा थ्रू म्युझिक' हा विशेष सिम्फोनिक ऑर्केस्ट्रा कार्यक्रम असेल. महोत्सवातील प्रमुख चित्रपट आणि विशेष विभाग : ८६ देशांतील १५० हून अधिक चित्रपटांचा समावेश असून, यंदा महोत्सवात जागतिक चित्रपटसृष्टीचा अनोखा संगम पाहायला मिळणार आहे.

स्पेन हा 'कंट्री ऑफ ऑनर' तर रशिया 'पार्टनर कंट्री' आहे. पोलिश दिग्दर्शक पावेल पावलिकोव्स्की यांच्या 'फादरलँड' चित्रपटाने महोत्सवाची सुरुवात होईल. मध्यवर्ती चित्रपट म्हणून अलिना सेरबन दिग्दर्शित 'आय मॅटर' दाखवला जाईल, तर सिंगापूरचे दिग्दर्शक अँथनी चेन यांच्या 'वी आर ऑल स्ट्रेंजर्स'ने २८ रोजी महोत्सवाची सांगता होईल.

परीक्षक मंडळ आणि पुरस्कार :

महोत्सवात सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी प्रतिष्ठित 'सुवर्ण मयूर' तर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, अभिनेता, अभिनेत्री, विशेष परीक्षक पुरस्कार आणि पदार्पणातील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकासाठी 'रौप्य मयूर' पुरस्कार दिले जातील. परीक्षक मंडळाचे अध्यक्षपद दिग्दर्शक आनंद एल. राय भूषवणार आहेत. 'इंडियन पॅनोरमा'च्या फीचर फिल्म विभागाचे अध्यक्ष मधुर भांडारकर, तर नॉन-फीचर फिल्म विभागाचे अध्यक्ष हिमंशू शेखर खटुआ हे आहेत. यावेळी परीक्षकांचा विशेष सत्कार आहे.

इंडियन पॅनोरमा आणि ब्रिक्स

भारतीय चित्रपटांच्या 'इंडियन पॅनोरमा' विभागात १८ भाषांतील ७६ चित्रपटांचे सादरीकरण होईल. यासोबतच 'ब्रिक्स' देशांच्या चित्रपटांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. यंदा प्रथमच 'ॲनिमेशन' आणि चित्रपट निर्मितीची कला उलगडणारा 'फिल्म्स अबाऊट फिल्म्स' हे दोन नवे विभाग सुरू करण्यात आले असून, या प्रत्येक विभागात प्रत्येकी पाच निवडक चित्रपट दाखवले जातील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT