IFFI 2026 
गोवा

IFFI 2026 | इफ्फीमध्ये 'अ फ्यू डेज इन द सन' चित्रपटाची चर्चा; सामाजिक विषमतेवर भाष्य

IFFI 2026 | हा चित्रपट, महोत्सवातील 'सिनेमा ऑफ द वर्ल्ड' विभागात समाविष्ट करण्यात आला असून, या संवादातून चित्रपटाची निर्मिती प्रक्रिया आणि त्यामागचा सर्जनशील दृष्टिकोन यावर प्रकाश पडला.

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा

गोव्यामध्ये आयोजित ५७ व्या इफ्फी अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत, दिग्दर्शक मौरो मुलर, लेखक होजे डेव्हिड फिगेरोआ गार्सिया आणि निर्माती लेस्ली होलरन यांनी त्यांच्या 'अ फ्यू डेज इन द सन' या द्वैभाषिक चित्रपटाबद्दल माहिती दिली. हा चित्रपट, महोत्सवातील 'सिनेमा ऑफ द वर्ल्ड' विभागात समाविष्ट करण्यात आला असून, या संवादातून चित्रपटाची निर्मिती प्रक्रिया आणि त्यामागचा सर्जनशील दृष्टिकोन यावर प्रकाश पडला.

मेक्सिकोच्या रिव्हिएरा माया भागात, एक श्रीमंत युरोपीय जोडपे बेकायदेशीर मार्गांचा वापर करून स्थानिक समुदायाला त्या जमिनीवरून हटवण्यास भाग पाडत आहे, या ठिकाणी विकास प्रकल्प राबवण्याचे नियोजन आहे. दरम्यान, कामगार वर्गातील एक मेक्सिकन कुटुंब एका किशोरवयीन मुलाला तुरुंगात जाण्यापासून वाचवण्यासाठी एका भ्रष्ट पोलिस अधिकाऱ्याबरोबर एक जोखमीचा करार करते.

जेव्हा त्यांची उद्दिष्टे एकमेकांशी छेद देतात, तेव्हा दोन्ही जोडपी एका हिंसक अपहरणाच्या घटनेत ओढली जातात, आणि लवकरच परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाते. एका कठीण परिस्थितीत अडकल्यावर, त्यांना आपापल्या कृतीचे परिणाम भोगावे लागतात, यादरम्यान त्यांना उमजते की, अधिकार आणि जगण्यासाठीचा संघर्ष त्यांना अपेक्षेपेक्षा अधिक जवळ आणू शकतो.

या चित्रपटाची निर्मिती पाच देशांच्या (मेक्सिको, डॉमिनिकन रिपब्लिक, जर्मनी, अमेरिका आणि स्वित्झर्लंड) आंतरराष्ट्रीय सहनिर्मितीद्वारे आणि दोन भाषांमध्ये (इंग्रजी आणि स्पॅनिश) झाली आहे. त्यांच्या स्वतःच्या आयुष्याने कथा आणि त्यांचा दृष्टिकोन याला कसा आकार दिला गेला हे मुलर यांनी सांगितले.

त्यांच्या जीवनाचा सुरुवातीचा काळ स्वित्झर्लंडमध्ये गेला, आणि त्यांनी मेक्सिको आणि अमेरिकेतही वास्तव्य केले आहे. त्यांचा यावर विश्वास आहे की, सहानुभूती निर्माण करण्यासाठी विविध देशांमध्ये प्रवास करणे आणि तिथे राहणे आवश्यक आहे, यामधून हे शिकायला मिळते की जगण्याची केवळ एकच पद्धत नसते आणि जगण्याची कोणतीही पद्धत दुसऱ्या पद्धतीपेक्षा चांगली किंवा वाईट नसते.

ते म्हणाले की, विविध भाषा जाणून घेतल्यावर आणि विविध ठिकाणी प्रवास केल्यावर लोक वेगवेगळे निर्णय घेतात, आणि त्यांच्या सभोवतालच्या व्यवस्था आणि संस्था त्या निवडींच्या परिणामांना कसे आकार देतात हे समजायला मदत होते. मुलर हे इफ्फी साठी अपरिचित नाहीत. गोव्यात नोव्हेंबर २०२५ मध्ये आयोजित ५६ व्या इफ्फी महोत्सवात त्यांच्या 'द जॅनिटर' या चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमियर झाला होता.

गार्सिया यांनी संस्कृती आणि सामाजिक वर्गांमधील संघर्षावर भर दिला, हा विरोधाभास या चित्रपटात स्पष्टपणे दिसून येतो असे त्यांनी नमूद केले. जेव्हा अशा प्रकारचे निर्णय घेतले जातात, तेव्हा श्रीमंत युरोपीय पात्रांना त्याचे परिणाम भोगावे लागत नाहीत, मात्र कामगार वर्गातील जोडप्याच्या बाबतीत तसे घडत नाही, त्यांचे आयुष्य पूर्णपणे बदलून जाते.

याला होकार देत हॉलरन म्हणाल्या की, एखाद्या गरीब व्यक्तीसाठी अगदी छोटीशी चूक देखील सर्वनाशाला कारणीभूत होऊ शकते. या चित्रपटात, ज्यांनी कैद्यांना ओलीस ठेवले आहे ते, आणि जे ओलीस आहेत ते कैदी असे सर्वजण एका अर्थाने आपापल्या परिस्थितीच्या कैदेत अडकले आहेत.

भ्रष्टाचार समाजाच्या प्रत्येक स्तरावर कसा पसरलेला आहे याचा देखील गार्सिया यांनी शोध घेतला आहे. खालच्या स्तरावर तो लाचखोरीसारखे अधिक थेट असतो तर एखाद्या समुदायाला जमिनीच्या तुकड्यावरून बेकायदेशीरपणे हाकलून देण्याचा श्रीमंत जोडप्याचा प्रयत्न म्हणजे सत्ता आणि राजकारणाशी जोडलेला एक वरच्या पातळीवरचा भ्रष्टाचार आहे जो सामान्यपणे स्वीकारला जातो.

हा चित्रपट दोन्ही प्रकारच्या भ्रष्टाचारांना एकाच पातळीवर आणण्याचा प्रयत्न करतो. मुलर आणि गार्सिया यांनी जगभरात विस्तारणाऱ्या असमानतेबद्दल तसेच लोकांचे त्यांच्या सामाजिक-आर्थिक वर्गाच्या आधारे कशा प्रकारे वर्गीकरण केले जाते त्याबद्दल देखील भाष्य केले. लोक नैतिकदृष्ट्या संदिग्ध निर्णय का घेतात याविषयी सहानुभूती निर्माण करणे हा या चित्रपटाचा उद्देश आहे, असे मुलर यांनी सांगितले.

प्रवास करण्याचे महत्त्व केले स्पष्ट : हॉलरन

हॉलरन म्हणाल्या की, जगभरातील लोक समानता, ओळख, प्रतिनिधित्व यांसाठी भुकेलेले असतात आणि न्याया तसेच निःपक्षपणा यांच्या दिशेने पुन्हा जाताना, विविधतेशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत असतात, असे निरीक्षण त्यांनी नोंदवले. नव्या भाषा ऐकण्यासाठी तसेच नव्या संस्कृतीची चव आणि सुवास घेण्यासाठी, परिचित परिसराच्या पलीकडे प्रवास करण्याचे महत्त्व त्यांनी ठळकपणे सांगितले. जर लोक अधिकाधिक प्रवास करू शकले तर हे जग अधिक चांगली जागा बनेल, असे त्या म्हणाल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT