धावे : पुढारी वृत्तसेवा
हिवरे सत्तरी येथील काजू बागायतीमध्ये असलेल्या महादेव लक्ष्मण गावकर यांच्या झोपडीला मंगळवारी सकाळी ११.३० वा. अचानक आग लागून झोपडी जळून खाक झाली. झोपडीला लागलेली आग दुपारच्या रणरणत्या उन्हात इतरत्र पसरली व सभोवताली असलेल्या काजू बागायतीत पसरली.
या घटनेत ३ लाखांचे नुकसान झाले आहे. काजू बागायतीत पसरलेली स्थानिकांनी आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. अग्निशामक दलाला सूचना देण्यात आली. अग्निशामक दलाचे जवान दोन अग्निशामक वाहने घेऊन घटनास्थळी पोहोचले; परंतु आगीचा बंब घटनास्थळी पुरेसा रस्ता नसल्यामुळे पोहोचू शकला नाही.
शेवटी अग्निशामक दलाचे जवान तसेच स्थानिक ग्रामस्थ यांच्यानी झाडांच्या फांद्या घेऊन आग आटोक्यात आणली. तोपर्यंत महादेव गावकर, दोलू गावकर, तुकाराम गावकर, आप्पा गावकर, यांच्या काजू बागायतींचे नुकसान झाले.
वाळलेले तण वेळेत काढावेत
आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशामक दलाचे ए एन देसाई, एम एस गावडे, ए. जी. नार्वेकर, ए. यू. गावकर, आर. यू. गावकर, ए. ए. शेटकर यांच्यानी भाग घेऊन आग आटोक्यात आणली. शेतकऱ्यांनी आपल्या बागेतील वाळलेले तण वेळेवर काढून आगीला प्रतिबंध करावा, असे आवाहन अग्निशामक दलातर्फे करण्यात आलेले आहे.
२ लाखांची मालमत्ता वाचविली
एकूण तीन लाख रुपयांहून जास्त रुपयांची वित्तीय हानी झालेली आहे व २ लाखांहून जास्त रुपयांची मालमत्ता वाचविण्यामध्ये अग्निशामक दलाला यश आले.