विठ्ठल गावडे पारवाडकर
पणजी : राज्यात 2005 मध्ये 1029 एचआयव्ही बाधित सापडले होते. वीस वर्षांनंतर ही संख्या 235 पर्यंत खाली आली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेच्या उपाययोजनांचा सकारात्मक परिणाम होत असून राज्यातील एचआयव्ही बाधितांची संख्या झपाट्याने कमी होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
एड्स नियंत्रण संस्थेच्या प्रकल्प अधिकारी डॉ. वंदना धुमे यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात एचआयव्ही बाधितांची संख्या कमी व्हावी किंबहुना कोणाला एचआयव्हीची बाधाच होऊ नये, यासाठी एड्स नियंत्रण संस्थेतर्फे अनेक जागृती कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. गरोदर महिलांसह सर्वसामान्य नागरिकांना एचआयव्ही बाधा होण्याचे धोके सांगून जागृत केले जाते. त्याचा परिणाम चांगला दिसून आलेला आहे. 2024 मध्ये 1 लाख 50 हजार नागरिकांची रक्त तपासणी करण्यात आली होती. ज्यात गरोदर महिलांचाही समावेश होता. त्यात 235 जणांना एचआयव्हीची बाधा झाल्याचे निदान झाले. तर जानेवारी ते मे 2025 या पाच महिन्यांच्या काळात 103 एचआयव्ही बाधित आढळले आहेत. सर्व आरोग्य केंद्रात तपासणीसाठी येणार्या गरोदर महिला व आजारी व्यक्तीचे रक्त नमुने घेतले जातात. त्यातील एक नमुना एड्स नियंत्रण संस्थेकडे येतो. त्याची चाचणी केली जाते.
त्या म्हणाल्या, जे पॉझिटिव्ह सापडतात त्यांच्यावर गोवा वैद्यकीय महाविद्यालय बांबोळी व हॉस्पिसियो मडगाव येथे तपासणी केंद्रात उपचार केले जातात. हे सर्व उपचार व औषधे मोफत दिली जातात. राज्यात एचआयव्ही बाधितांना आता चांगले उपचार मिळू लागल्याने बाधितांची संख्या कमी झाल्याचे डॉ. धुमे यांनी सांगितले.
एचआयव्ही बाधित झालेली व्यक्ती योग्य उपचार व औषधे घेत नसेल तर त्याचे रुपांतर एड्समध्ये होते. राज्यात दरवर्षी सरासरी 10 ते 12 जणांचे एड्सने मृत्यू होतात, अशी माहिती डॉ. धुमे यांनी दिली.
एचआयव्ही बाधित लोकांना पूर्वी वेगळ्या नजरेने बघितले जात होते. आता सर्वसामान्य प्रमाणे त्यांना वागणूक मिळत आहे. एचआयव्ही बाधित व्यक्तीने जर चांगले उपचार व औषधे घेतली, तर ती 25 ते 30 वर्षे आरामदायी जीवन जगू शकते, अशी माहिती डॉ. धुमे यांनी दिली.
पूर्वी एचआयव्ही बाधित महिला गरोदर राहिली आणि त्याला मूल झाले तर त्या बाळाला एचआयव्ही बाधा होत असे. मात्र, आता गरोदर काळामध्ये महिला चांगले उपचार आणि औषधे घेत असल्यामुळे बहुतांश महिलांच्या मुलांना एचआयव्ही लागण होत नसल्याचे दिसून आले आहे. हा आकडा सध्या शून्य असल्याचे डॉ. धुमे यांनी सांगितले. बाळ एचआयव्ही निगेटिव्ह जन्माला आले तरी त्याची अठरा महिने होईपर्यंत वारंवार रक्त तपासणी केली जाते, असेही त्यांनी सांगितले.