Goa Politics  
गोवा

Goa Politics | 1994 मध्ये स्वबळावर चार महिला आमदारांचा विजय

Goa Politics | आत्तापर्यंतच्या महिला आमदारांची संख्या फक्त तेरा : महिलांनी स्वतःचे शक्तिस्थान निर्माण करण्याची गरज

पुढारी वृत्तसेवा

पणजी : विठ्ठल गावडे पारवाडकर

सध्याच्या घडीला राज्यात ४० मतदारसंघ असून, २०२२ च्या निवडणुकीत फक्त तीन महिला आमदार निवडून आल्या. त्याही मंत्री वा आमदार असलेल्या त्यांच्या पतीच्या पाठिंब्यावर. मात्र एक काळ असाही होता की स्वबळावर एकाच वेळी चार-चार महिला गोवा विधानसभेत निवडून आल्या होत्या. १९९४ मध्ये ही किमया घडली होती.

शशिकलाताई काकोडकर (मये), व्हिक्टोरिया फर्नांडिस (सांताक्रुझ), फातिमा डिसा (हळदोणा) व संगीता परब (मांद्रे) या त्या महिला आमदार होत्या. तशी किमया त्यानंतर राज्यातील महिलांना करता आली नाही. आत्तापर्यंत राज्यात झालेल्या महिला आमदारांचा विचार करता त्यांची संख्या तेरा असून, यातील फिलीस फारिया व सुलोचना काटकर या स्वीकृत आमदार होत्या.

यातील शशिकलाताई काकोडकर, व्हिक्टोरिया फर्नांडिस व जेनिफर मोन्सेरात या दोनपेक्षा जास्त वेळा निवडून आल्या आहेत. राज्यात महिला मतदारांची संख्या पुरुषांपेक्षा जास्त असतानाही महिलांना म्हणावे तसे प्रतिनिधित्व गोवा विधानसभेत मिळालेले नाही. खासदार म्हणून संयोगिता राणे या उत्तर गोव्यातून निवडून आल्या होत्या.

ज्या अकरा आमदार निवडून आल्या, त्यातील सहा महिलांना मंत्री होण्याची संधी मिळाली. शशिकलाताई काकोडकर नंतर व्हिक्टोरिया फर्नांडिस, संगीता परब, निर्मला सावंत, एलिना साल्ढाणा व जेनिफर मोन्सेरात या त्या महिला आमदार होत.

पतीच्या योगदानामुळे विजय

२०२२ च्या विधानसभा निवडणुकीत तीन महिला आमदार निवडून आल्या होत्या. त्या मंत्री वा आमदार यांच्या पत्नी म्हणून निवडून आल्या. या सर्वांना पती आमदार असल्यामुळेच उमेदवारी मिळाली होती. डॉ. देविया राणे या पर्येतून बहुमताने निवडून आल्या, त्यांच्या विजयात त्यांचे पती वाळपईचे आमदार व आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांचे पाठबळ होते.

शिवोलीतून निवडून आलेल्या डिलायला लोबो यांना त्यांचे पती कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांचे सहकार्य लाभले, तसेच ताळगावच्या दिवंगत आमदार जेनिफर मोन्सेरात या त्यांचे पती, पणजीचे आमदार व महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांच्यामुळे निवडून आल्या होत्या.

एकमेव महिला आमदार मुख्यमंत्री राज्यात निवडून आलेल्या अकरा आमदारांपैकी आत्तापर्यंत फक्त शशिकलाताई काकोडकर यांना मुख्यमंत्री होण्याची संधी मिळाली आहे. गोव्याचे पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांच्या निधनानंतर शशिकलाताई यांना मुख्यमंत्री होण्याची संधी मिळाली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT