पणजी : राज्यात 7 जुलैपासून कमी झालेला पाऊस सोमवार, दि. 14 रोजी मुसळधार पडण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. मंगळवार, दि. 15 जुलैपासून पाऊस उसंत घेण्याची शक्यता वेधशाळेने व्यक्त केली आहे.
वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार, मागील 24 तासांत 19.8 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. आतापर्यंत 1355.3 मि.मी. पाऊस अपेक्षित असताना 1313.6 मि.मी. पाऊस झाला आहे. तो 3.1 टक्के घटीत आहे. 17 जूनपासून 23 आणि 24 जूनचा पाऊस वगळता पाऊस सरासरीपेक्षा कमी, तुटीत पडत होता. आता 7 जुलैपासूनही तो कमी झाला आहे. मागील 24 तासांत सर्वाधिक पाऊस सांगे येथे 54.4 मि.मी. झाला आहे. त्या खालोखाल केपेत 35, धारबांदोडा येथे 34, काणकोण येथे 29 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
आतापर्यंत सर्वाधिक पाऊस धारबांदोडा येथे पडला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात पडत असलेल्या जोरदार पावसामुळे राज्याला पाणीपुरवठा करणार्या महत्त्वाच्या धरणांपैकी चार धरणे भरली आहेत. यात साळावली, गावणे, पंचवाडी या धरणांचा समावेश असून तिळारी धरण 86 टक्के भरल्याने धरणातून विसर्ग सुरू आहे.