पणजी : पुढारी वृत्तसेवा
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या तीव्र हवामान प्रणालीच्या प्रभावामुळे अर्नब चक्रीवादळाची शक्यता आहे. गोव्यात पुढील २४ तासांत काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. भारतीय हवामान विभागाच्या गोवा केंद्राने पावसासोबत ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट, सोसाट्याच्या वाऱ्याचा इशारा दिला आहे.
बंगालच्या उपसागरातील ही प्रणाली सध्या 'डीप डिप्रेशन' स्वरूपात आहे. ती पश्चिम-वायव्य दिशेने सरकत आहे. हवामान विभागानुसार, २३ सप्टेंबरच्या रात्री उत्तर आंध्र प्रदेश आणि दक्षिण ओडिशा किनारपट्टीदरम्यान, विशाखापट्टणम आणि गोपाळपूरच्या आसपास, कल्लिंगपट्टणमजवळून ती किनारा ओलांडण्याची शक्यता आहे.
या हवामान प्रणालीच्या प्रभावामुळे कोकण आणि गोव्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस आणि जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. वादळी परिस्थितीत वाऱ्याचा वेग ताशी ४० ते ५० किलोमीटरपर्यंत, तर काही ठिकाणी त्यापेक्षा अधिक राहण्याची शक्यता वर्तवली आहे. गोव्यातील मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.