vishwajit-rane Pudhari File Photo
गोवा

Canacona Health Centre | काणकोण इस्पितळाचा कायापालट होणार; 30 दिवसांत अहवाल सादर करण्याचे आरोग्यमंत्र्यांचे आदेश

Canacona Health Centre | आरोग्यमंत्री विश्वजित राणे : 30 दिवसांत घेणार अहवाल

पुढारी वृत्तसेवा

चावडी : पुढारी वृत्तसेवा

काणकोण सामाजिक इस्पितळातील समस्या केवळ चर्चेपुरत्या न ठेवता आता प्रत्यक्ष कृतीतून सोडविल्या जातील, अशी ठाम ग्वाही आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी दिली. इस्पितळातील त्रुटी दूर करण्यासाठी नोडल अधिकारी डॉ. केदार रायकर यांच्याकडून ३० दिवसांत सविस्तर अहवाल घेऊन पुढील कामाला सुरुवात करण्यात येणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

काणकोण तालुक्यात पूर्णवेळ स्त्रीरोग तज्ज्ञाची नितांत गरज असून, येथील महिलांना प्रसूतीसाठी अन्यत्र जाण्याची वेळ येऊ नये, यासाठी काणकोण इस्पितळातच सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील, असे मंत्री राणे यांनी सांगितले.

तसेच कर्नाटक सीमेलगतचा हा तालुका असल्याने कारवार व आसपासच्या भागातून येणाऱ्या रुग्णांसह महामार्गावरील अपघातग्रस्तांनाही तातडीची व दर्जेदार सेवा मिळावी, यासाठी रेडिओलॉजिस्ट, क्ष-किरण तज्ज्ञ व इतर आवश्यक तज्ज्ञांची नियुक्ती करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

रुग्णांना दिल्या जाणाऱ्या पोषक आहाराबाबतही बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. इस्पितळातील अधिकारी व वरिष्ठ डॉक्टरांसोबत झालेल्या बैठकीनंतर आरोग्यमंत्री राणे यांनी ही माहिती दिली.

समस्या सोडविण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केल्याबद्दल काणकोणचे आमदार तथा कला व संस्कृतीमंत्री डॉ. रमेश तवडकर यांनी आरोग्यमंत्री राणे यांचे आभार मानले.

कला व संस्कृतीमंत्री डॉ. रमेश तवडकर, काणकोण सामाजिक इस्पितळाचे नोडल अधिकारी डॉ. केदार रायकर, डॉ. राजेंद्र बोरकर, आरोग्याधिकारी जुजे तावारिस, डॉ. दिवाकर वेळीप, जि. पं. सदस्य अजय लोलयेकर आदी उपस्थित होते.

काणकोणला तीन डॉक्टर देणार...

राज्य सरकारला आवश्यक असलेल्या ७० डॉक्टरांपैकी ६० डॉक्टर उपलब्ध झाले आहेत. त्यापैकी तीन डॉक्टर काणकोण सामाजिक इस्पितळात देण्यात येणार आहेत. काणकोणातील जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्यास सरकार कटिबद्ध असल्याचे मंत्री राणे म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT