हरमल : पुढारी वृत्तसेवा
राज्य सरकारने जमीन रुपांतरणाबाबत पेडणे तालुक्याला लक्ष्य केले आहे. सत्तरी सारखे गाव सांभाळून पेडणे तालुका बेचिराख करण्याचे काम करू नये. भटवाडी हरमलचे जमीन रूपांतरण रद्द न झाल्यास विधानसभा अधिवेशन काळात सचिवालयावर धडक मोर्चा नेण्याचा इशारा हरमलवासियांनी दिला.
पर्यावरण बचाव समितीतर्फे रविवारी 'हरमल वाचवा गोवा वाचवा', अशी हाक देत मशाल मिरवणूक काढण्यात काढण्यात आली. त्याला हरमलवासियांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मिरवणुकीनंतर सार्वजनिक गणेशोत्सव सभागृहात सभा झाली. यावेळी किशोर नाईकगावकर म्हणाले, तेरेखोल सारख्या गावातील लोकांनी गावच्या रक्षणासाठी धडक मोर्चा दिला होता.
पारंपरिक रापणकर लोकांना आवश्यक सोयी सुविधा न देता, त्यांचे इव्हेंट केले जात आहेत. हरमलवासियांनी जागे राहिले पाहिजे. आमदार, माजी आमदारांनी या मोहिमेत सहभागी होण्याची गरज होती. कारण ते लोकप्रतिनिधी आहेत. त्यांना जाब विचारायला हवा. नवनिर्वाचित जिल्हा पंचायत सदस्य राधिका पालयेकर यांनी उपस्थित राहून धाडस केले.
त्यांनी दबावाची पर्वा न करता गावासोबत त्या उभ्या ठाकल्या आहे. त्यामुळे त्यांचे धाडस कौतुकास्पद असल्याचेही ते म्हणाले. स्वप्नेश शेर्लेकर म्हणाले, पेडणे तालुक्यावर कोणीही अत्याचार करू नये. काँग्रेसमधील भ्रष्ट लोकांना घेऊन भाजपने सरकार घडवले असून राज्यात भ्रष्ट कारभार चालू केला आहे. त्यामुळे जनतेने विचार करायला हवा.
गोवा रक्षणासाठी राजकीय मतभेद विसरा...
आजची मशाल गावगावात नेणार असून भ्रष्ट सरकारविरोधात जनजागृती करण्याचे काम हाती घेतले जाणार आहे. गावचे रक्षण व गोवा राखून ठेवला पाहिजे. त्यासाठी राजकीय मतभेद विसरून, एकत्र राहून हा लढा चालू ठेवला पाहिजे, असे दीपक कळंगुटकर म्हणाले.