Rohan khawante 
गोवा

Har Ghar Fiber Proje | 'हर घर फायबर'चे काम पूर्णत्वासाठी लागणार 270 दिवस

Har Ghar Fiber Proje | मंत्री रोहन खंवटे : प्रकल्प साखळी, डिचोलीपुरता मर्यादित

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा
राज्य सरकारने वर्षभरापूर्वी सुरू केलेला 'हर घर फायबर' प्रकल्प सध्या साखळी आणि डिचोली मतदारसंघातील काही भागांपुरताच मर्यादित आहे. या दोन्ही भागांतील काम येत्या २७० दिवसांत पूर्ण करून प्रकल्प कार्यान्वित करण्याचे नियोजन आहे. हा प्रकल्प राज्यव्यापी उपक्रम म्हणून जाहीर करण्यात आला असला तरी सध्या त्याची अंमलबजावणी दोन निश्चित क्षेत्रांपुरतीच सुरू असल्याचे माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स आणि दळणवळण (आयटी) खात्याने स्पष्ट केले आहे.

सर्वात कमी बोली लावणाऱ्या नुपूर टेक्नॉलॉजीज कंपनीला एप्रिलमध्ये या कामाचे कंत्राट देण्यात आले आहे. आयटी मंत्री रोहन खंवटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'हर घर फायबर' प्रकल्पाचे काम सुरू झाले असून आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रकल्पांतर्गत भूमिगत ऑप्टिकल फायबर केबल नेटवर्क टाकणे, त्याची चाचणी, कार्यान्वयन तसेच संचालन व देखभाल करण्याचा समावेश आहे.

साखळी आणि डिचोलीतील निश्चित भागांमधील घरांना हाय-स्पीड फायबर-टू-द-होम (FTTH) कनेक्टिव्हिटी उपलब्ध करून देण्यासाठी हे काम सुरू आहे. या प्रकल्पासाठी गोवा माहिती तंत्रज्ञान विकास महामंडळामार्फत वित्तपुरवठा करण्यात आला आहे.

केंद्र सरकारने ऑक्टोबर २०२२ मध्ये २०२२-२३ या वर्षासाठी राज्यांना भांडवली गुंतवणुकीसाठी विशेष सहाय्य योजनेअंतर्गत या प्रकल्पासाठी ५० कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केले होते, अशी माहिती खंवटे यांनी दिली. यापूर्वी केंद्र सरकारच्या भारतनेट कार्यक्रमांतर्गत संपूर्ण गोव्यात नवीन फायबर नेटवर्क उभारण्याचे काम सुरू करण्यात आले होते.

२००९ मध्ये सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) मॉडेलद्वारे बहुतांश ग्रामपंचायतींना तालुका मुख्यालयांशी यशस्वीपणे जोडणारे गोवा हे देशातील पहिले राज्य ठरले होते. मात्र, सध्याचे गोवा ब्रॉडबँड नेटवर्क (जीबीबीएन) कालबाह्य झाले असून, त्यावरील उपकरणांची वॉरंटीही संपली आहे.

त्यामुळे नवीन आणि आधुनिक फायबर नेटवर्कची गरज निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर 'हर घर फायबर' प्रकल्प राबविण्यात येत असून, साखळी आणि डिचोलीतील निश्चित भागांमध्ये प्रकल्प पूर्ण करून कार्यान्वित करण्यासाठी आणखी २७० दिवस लागणार असल्याचे ते म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT