पणजी : पुढारी वृत्तसेवा
म्हापसा न्यायालयाने हडफडे नागोआ ग्रामपंचायतीचे सरपंच रोशन रेडकर आणि निलंबित तत्कालीन सचिव रघुवीर बागकर यांना दिलेला अंतरिम अटकपूर्व जामीन पुढील सुनावणीपर्यंत, म्हणजेच २३ डिसेंबरपर्यंत वाढवला आहे, त्यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी पूर्ण न झाल्याने ती पुढे ढकलण्यात आली आहे.
सरपंच रेडकर यांचे वकील नितीन सरदेसाई यांनी न्यायालयात युक्तिवाद करताना सांगितले की, व्यावसायिक परवाना (ट्रेड लायन्स) देणे आणि सदोष या कलमांचा कोणताही थेट संबंध नाही. २०२३ व्यावसायिक परवाना देण्यात आला होता व त्याचा गैरवापर होईल, अशी कल्पनाही नव्हती, असे त्यांनी स्पष्ट केले.
सरदेसाई यांनी पुढे सांगितले की, पंचायत हद्दीतील व्यवसायांना परवाना देण्याचा अधिकार सरपंचाना आहे. व्यवसायासाठी पंचायत परवाना मिळणे म्हणजे इतर सर्व कायद्यांखाली आपोआप परवानगी मिळते असे नाही.
वीज जोडणीसाठी वीज खात्याची, तर पाणी जोडणीसाठी जलसंपदा विभागाची स्वतंत्र परवानगी आवश्यक असते. परवाना दिल्याने आपोआप गुन्हा सिद्ध होत नाही. हा निर्णय सामूहिक स्वरूपाचा होता, असेही त्यांनी नमूद केले.
संबंधित क्लब बेकायदेशीररीत्या सुरू असल्याचे पोलिसांना माहीत असूनही त्यांनी कारवाई का केली नाही, असा सवालही यावेळी उपस्थित करण्यात आला. न्यायालयाने दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकून घेत पुढील सुनावणीपर्यंत अंतरिम अटकपूर्व जामीन वाढवण्याचे आदेश दिले.