पणजी : पुढारी वृत्तसेवा
विरोधकांनी राज्यपालांच्या अभिभाषणापूर्वी हडफडे नाईट क्लब जळीतकांडावर चर्चा करण्याची मागणी सभापर्तीनी मान्य केली नाही. राज्यपालांच्या अभिभाषणावेळी सभागृहातून बाहेर काढल्याबद्दल विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली. विरोधी पक्षनेते युरी आलेमाव म्हणाले की, बर्च क्लब दुर्घटनेत निष्पाप जीव गेले. त्या मृतांना श्रद्धांजली वाहिल्यानंतर विरोधी पक्षाने घटनेवर बोलण्याची परवानगी मागितली होती; परंतु त्याऐवजी राज्यपालांनी सरकारचे पूर्व-लिखित भाषण वाचून दाखवले. त्यावरून हे सरकार असंवेदनशील असल्याचे स्पष्ट झाल्याचे आलेमाव म्हणाले. आमदार विजय सरदेसाई म्हणाले, अधिवेशनात हडफडे येथील क्लबमध्ये घडलेल्या जळीतकांडावर चर्चा होणे गरजेचे आहे. मात्र, विरोधकांची ही मागणी मान्य न करता सरकारने आपले खरे रूप दाखवले. हे सरकार सामान्यांचे नाही, हे सिद्ध केले. आपचे आमदार वेन्झी व्हिएगस यांनी मृत आत्म्यांचा अनादर केल्याबद्दल भाजपवर जोरदार टीका केली. सरकारने दिलेल्या बेकायदेशीर परवानगीमुळेच हडफडे येथे २५ निष्पाप लोकांचा जीव गेला. भाजप हा निर्दयी लोकांचा पक्ष आहे, असे ते म्हणाले.