पणजी : पुढारी वृत्तसेवा
हडफडे येथील बर्च बाय रोमिओ लेन नाईट क्लबच्या अग्निकांड दुर्घटनेमध्ये निष्पाप २५ जणांचा मृत्यू झाला आहे त्यामुळे या घटनेचा मुद्दा आम्ही हलक्यात घेत नाही. संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून गोव्याच्या हितासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलली जातील असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने आज केले. ही सुनावणी १२ रोजी पुढे सुरू ठेवण्यात आली आहे. नाईट क्लबच्या भीषण आगीसंदर्भात गोवा खंडपीठाने स्वेच्छा याचिका घेतली आहे. या घटनेशी संबंधित असलेली एक जनहित याचिका तसेच या नाईट क्लबच्या जमिनीच्या मालकाची याचिका यावर एकत्रित सुनावणी झाली. यावेळी अॅमिक क्युरी अॅड. रोहित ब्रास डिसा यांनी इमारत नियमांचे पालन न केल्याने ही दुर्घटना घडल्याचे सांगितले. यावेळी सुनावणीवेळी गोवा खंडपीठाने तोंडी निरीक्षण करताना सांगितले की, बेकायदेशीर कारवायांना संरक्षण देणारी संपूर्ण यंत्रणा उद्ध्वस्त उद्घ केली पाहिजे. गोव्यातील पर्यावरण, कायदा व सुव्यवस्थेला धक्का देणाऱ्या सर्व गैरप्रकारांवर कठोर कारवाईचे संकेत न्यायालयाने दिले आहेत. गोवा खंडपीठाने यापूर्वी एका जनहित याचिकेत इमारत नियमांनुसार परवाने नसलेली बांधकामे पाडण्याची तसेच सरकारी तसेच कोमुनिदाद जमिनीतील अतिक्रमणे हटवण्याचे निर्देश दिले आहेत. या आदेशानंतर सरकारने कायद्यात दुरुस्ती करून किनारपट्टी भागात शक्ससाठी पंचायतीचा परवाना पुरेसा आहे अशी शिथिलता केली. इमारत नियमांनुसार परवानगीसाठी टेक्निल क्लियरन्स, अग्निशमन दलाचा परवाना तसेच भोगवटा परवाना आवश्यक आहे. यापैकी एकही परवाना या नाईट क्लबकडे नव्हता, अशी बाजू अॅड. रोहित ब्रास डिसा यांनी मांडली.