हडफडे दुर्घटनेप्रकरणी पोलिस कोठडीत असलेल्या तिघांनी जामिनासाठी अर्ज दाखल केला.
तपास अधिकारी व्यस्त असल्याने सरकारकडून उत्तरासाठी वेळ मागण्यात आला.
न्यायालयाने जामिनावरील सुनावणी १८ डिसेंबरपर्यंत तहकूब केली आहे.
तिघेही नाईट क्लबचे कर्मचारी असून आपला गुन्ह्याशी संबंध नसल्याचा दावा करत आहेत.
पणजी : पुढारी वृत्तसेवा
हडफडे दुर्घटनेप्रकरणी पोलिस कोठडीत असलेल्या तिघा संशयितांनी म्हापसा अतिरिक्त सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला आहे. या दुर्घटनेच्या तपासकामात तपास अधिकारी व्यस्त असल्याने उत्तर देण्यासाठी वेळ मागण्यात आला. न्यायालयाने वेळ देऊन ही सुनावणी गुरुवारी १८ डिसेंबरला ठेवली आहे.
बर्च बाय रोमिओ लेन नाईट क्लब व्यवस्थापन अधिकारी प्रियांशू कृष्णकुमार ठाकूर, विवेक चंद्रभान सिंग व राजवीर रुद्रनाथ सिंघानिया यानी जामिनासाठी अर्ज केला आहे. गेल्या ७ डिसेंबरला त्याना हणजूण पोलिसांनी अटक केली होती तेव्हापासून ते पोलिस कोठडीत आहेत.
या दुर्घटनेशी त्यांचा काहीच संबंध नाही, ते या क्लबमध्ये कर्मचारी होते. तपासावेळी त्यांनी पोलिसांना सहकार्य केले आहे. त्यामुळे त्याना जामीन देण्यात यावा अशी बाजू त्यांच्या वकिलांनी मांडली. सरकारी वकिलांनी न्यायालयाला सांगितले की, या प्रकरणाच्या तपासकामात हणजूण पोलिस स्थानकाचे निरीक्षक व्यस्त असल्याने ते न्यायालयात हजर राहू शकले नाहीत.
या प्रकरणात सरकारी युक्तिवादमध्ये मला मदत करण्यासाठी नियुक्त केलेल्या सहकाऱ्याशी बोलणी करायची आहे. त्यामुळे ही सुनावणी तहकूब करण्याची विनंती सरकारी वकिलांनी केली. यावेळी संशयिताच्या वकिलांनी तोपर्यंत अंतरिम जामीन द्यावा,
अशी विनंती केली असता सरकारी वकिलांनी त्याला आक्षेप घेतला. न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर ही सुनावणी १८ डिसेंबरपर्यंत पुढे ढकलताना अंतरिम जामीन देण्यास नकार दिला.