Goa State Pollution Control  
गोवा

Goa State Pollution Control | हॉटेल्स अन् रेस्टॉरंट्ससाठी नवीन नियम! गोव्यात ग्रीस ट्रॅप वापराबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळ आक्रमक

Goa State Pollution Control | राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाची माहिती : पणजी, मडगावमध्ये १०० आस्थापनांत प्रायोगिक प्रकल्प

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा

राज्यातील खाद्य पदार्थ आस्थापनांसाठी लवकरच ग्रीस ट्रॅपसंदर्भात कडक नियम लागू केले जाणार असून, प्रमुख शहरी भागांतील १०० खाद्य आस्थापनांचा समावेश असलेला प्रायोगिक प्रकल्प हाती घेतला जाणार आहे. गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (जीएसपीसीबी) अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, रेस्टॉरंट, हॉटेल, कॅन्टीन, मेजवानी सभागृह तसेच स्वयंपाकघराचे कामकाज असलेल्या इतर व्यावसायिक खाद्य आस्थापनांना त्यांचे तेल व ग्रीस ट्रॅप योग्यरीत्या कार्यरत असल्याची खात्री करावी लागणार आहे.

यासाठी मंडळ देखभालीची मानके निश्चित करणाऱ्या अनुपालन आराखड्यावर काम करीत आहे. जीएसपीसीबी कार्यगट स्थापन करून तीन महिन्यांत हा आराखडा तयार करण्याच्या तयारीत आहे. पणजी, मडगाव यांसारख्या प्रमुख पालिका क्षेत्रांतील ५० ते १०० खाद्य आस्थापनांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर नऊ महिन्यांत त्याची अंमलबजावणी करण्याचे लक्ष्य आहे.

सातत्याने तपासणी करता येत नसल्याने सध्याच्या व्यवस्थेत अनुपालनाच्या दृष्टीने त्रुटी असल्याचे मंडळाच्या निदर्शनास आले आहे. केवळ तेल व ग्रीस ट्रॅप बसवल्याने स्वयंपाकघरातील सांडपाण्यातील प्रदूषके प्रभावीपणे दूर होतीलच, याची खात्री नसते. ट्रॅपची नियमित तपासणी व स्वच्छता आवश्यक असते. सातत्याने वापर झाल्याने तरंगणारे ग्रीस पृष्ठभागावर जमा होते, तर अन्नाचा घनकचरा तळाशी साचतो. त्यामुळे नव्या उपक्रमाची गरज असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT