Women Empowerment Pudhari
गोवा

Gruha Aadhar Scheme | गृहआधार योजनेतून गृहिणींना 980 कोटींचे वितरण

Gruha Aadhar Scheme | मंत्री विश्वजीत राणे : महिला कल्याण योजनांची रक्कम वाढवण्याचा सरकारचा विचार

पुढारी वृत्तसेवा

चावडी : पुढारी वृत्तसेवा
गृहआधार योजनेतून गोव्यातील गृहिणींना आतापर्यंत ९८० कोटी रुपये वितरीत करण्यात आले आहेत. महिला व बालकल्याण खात्यातर्फे राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांची रक्कम वाढवण्याचा सरकारचा विचार आहे, अशी माहिती आरोग्य तथा महिला व बालकल्याणमंत्री विश्वजीत राणे यांनी दिली.

काणकोण नगरपालिका सभागृहात आयोजित 'अंगण की सेवा' कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार तथा कला व संस्कृतीमंत्री डॉ. रमेश तवडकर आणि भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्ष नीतू देसाई उपस्थित होत्या. केंद्रात आणि गोव्यात भाजपचे सरकार असल्याने केंद्राच्या मदतीतून राज्यात विविध योजनांचा लाभ मिळत असल्याचे राणे यांनी सांगितले.

महिला स्वावलंबी व्हाव्यात, यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे डॉ. रमेश तवडकर यांनी नमूद केले. महिला व बालकल्याण संचालनालयाच्या योजनांची माहिती सीडीपीओ प्रियंका गावकर यांनी दिली. 'एक पेड माँ के नाम' योजनेअंतर्गत काणकोण पालिकेने १०० रोपांची लागवड करून त्यांचे संवर्धन केल्याची माहिती प्रेसी फर्नांडिस यांनी दिली.

यावेळी मंत्री विश्वजीत राणे यांच्या हस्ते काणकोण सामाजिक आरोग्य केंद्रातील बालकांच्या तपासणी विभागाचे उद्घाटन करण्यात आले. डॉ. वीरेंद्र नाईक गावकर आठवड्यातून एकदा बालकांची तपासणी करणार आहेत. यावेळी काणकोण आरोग्य कल्याण समितीचे अध्यक्ष डायगो दा सिल्वा आणि पत्रकार सोय्रू कोमरपंत यांनी सामाजिक इस्पितळाचा दर्जा वाढवण्यासह डॉक्टर उपलब्ध करून देण्याबाबत निवेदन सादर केले.

मडगाव येथील जिल्हा इस्पितळाचा दर्जा सुधारण्यात येणार असून, डिसेंबरपर्यंत सर्व सुविधा मोफत उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. याचा काणकोणवासीयांना अधिक फायदा होईल, असेही राणे यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT