पणजी : बैठकीत बोलताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत. बाजूला मंत्री बाबूश मोन्सेरात. Pudhari File Photo
गोवा

सरकारचा कुशल मनुष्यबळ विकासावर भर : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

विविध उद्योग संस्थांशी साधला संवाद

पुढारी वृत्तसेवा

पणजी : राज्यातील अनेक उद्योगांना कुशल कामगारांची नितांत आवश्यकता असून यासाठी राज्य सरकारच्या कौशल्य विकास प्रशिक्षणाचा लाभ घेऊन युवकांनी रोजगार संधी मिळवाव्यात, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले आहे.

मंत्रालयात मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील कुशल मनुष्यबळ आणि प्रशिक्षण गरजांवर केंद्रित उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी महसूल व कामगार मंत्री बाबूश मोन्सेरात, मुख्य सचिव डॉ. व्ही. कांडावेलू, कामगार आयुक्त मार्टिन, ईपीएफओ अधिकारी, औषधनिर्माण, शिपिंग, पर्यटन, ऑटोमोबाईल, सेवा क्षेत्रातील प्रतिनिधी तसेच विविध औद्योगिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी ते बोलत होते.

या बैठकीत अत्यंत कुशल कामगारांसाठी किमान वेतन दर पुनर्रचना करण्याचा प्रस्तावावर चर्चा करण्यात आली. ग्रामीण भागातून औद्योगिक क्षेत्रांमध्ये कामासाठी प्रवास करणार्‍या मजुरांच्या वाहतूक अडचणी दूर करण्यासाठी पावले उचलण्याचे ठरले आहे. याशिवाय उदयोन्मुख क्षेत्रांत शाश्वत रोजगाराच्या संधी निर्माण करणे, वर्तमान व भविष्यातील रिक्त पदांनुसार उद्योग समर्पक प्रशिक्षण अभ्यासक्रम सुरू करणे, कामगार विभागाकडील नोंदणीकृत उमेदवारांचा डेटाबेस उद्योगांना देऊन भरती प्रक्रिया सुलभ करणे, शासकीय पाठबळ असलेल्या कौशल्य विकास योजनांद्वारे उद्योगांना प्रशिक्षण सहाय देणे, सर्व कंपन्यांमध्ये प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेची सक्तीने अंमलबजावणी करणे, साधनसामग्री आणि यंत्रणा हाताळणार्‍या कामगारांसाठी ऑन-द-जॉब डिप्लोमा कार्यक्रम राबविण्याचा प्रस्ताव बनविणे, यावर सविस्तर चर्चा झाली.

इतर ठळक निर्णय

* कामगारांसाठी लाभ पारदर्शकपणे देण्यासाठी ‘लेबर वेल्फेअर पोर्टल’ सुरू करणे

* गोमंतकीय ठेकेदारांना प्रोत्साहन देऊन बाह्य कामगारांवरील अवलंबित्व कमी करणे

* ‘जीएचआरडीसी’ मार्फत सुरक्षा व हाऊसकिपिंगमध्ये स्थानिकांना संधी

* वेळेवर वेतन आणि नियमांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी नियंत्रण यंत्रणा बळकट करणे

* विभिन्न औद्योगिक क्षेत्रांच्या विशिष्ट गरजा लक्षात घेऊन त्यांच्याकडून मिळालेल्या सूचना प्रशिक्षण धोरणात समाविष्ट करणे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT