Vishwajit Rane
गोव्यातील सरकारी इस्पितळे ठरली देशात अव्वल  pudhari photo
गोवा

गोव्यातील सरकारी इस्पितळे ठरली देशात अव्वल

पुढारी वृत्तसेवा
औदुंबर शिंदे

पणजी : राज्यातील दोन्ही जिल्हा इस्पितळे, फोंडा शासकीय इस्पितळासह खोर्ली, नावेली व चिंचणी या आरोग्य केंद्रांनी चांगल्या सुविधा देणाऱ्या शासकीय इस्पितळांमध्ये देशात अव्वल स्थान मिळाले आहे. त्यांना ९८ टक्के गुण मिळाले आहेत. त्यांना केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयातर्फे नक्स, लक्ष, आणि मुस्कान या श्रेणीत प्रमाणपत्र जाहीर झाले आहे. या यशाबद्दल आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

प्रधानमंत्री आयुष्मान भारत हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर मिशन या योजनेंतर्गत देशातील सर्व शासकीय इस्पितळे आणि आरोग्य केंद्रांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यात या सहा आरोग्य सुविधा पुरवणाऱ्या राज्यातील शासकीय आस्थापनांना चांगले गुण मिळाले आहेत.

दक्षिण गोव्यातील हॉस्पिसिओ या जुन्या शासकीय इस्पितळातील प्रत्येक विभागाची बारकाईने तपासणी करण्यात आली. त्यात महिला रोग आणि प्रसुती विभाग, बालरोग विभाग, शवचिकित्सा विभाग हे अव्वल ठरले आहेत. महिला संबंधीच्या शस्त्रक्रिया विभागाला ९८ टक्के, प्रसुती विभागाला ९६.९ टक्के, बालरोग विभाग आणि शवचिकित्सा विभागाला प्रत्येकी ९६ टक्के गुण मिळाले आहेत. याव्यतिरिक्त बाह्य रुग्ण तपासणी सेवा, औषधालय, रक्तपेढी यांनाही चांगले गुण मिळाले आहेत. आरोग्य केंद्रामध्ये चिंचणी आरोग्य केंद्राला राज्यात अव्वल स्थान मिळाले.

या केंद्राची देशातील आरोग्य केंद्रामध्ये पहिल्या शंभरात गणना झाली आहे. त्या पाठोपाठ नावेली आणि खोर्ली आरोग्य केंद्रांनाही प्रमाणपत्र मिळाले आहे. शासकीय इस्पितळे आणि आरोग्य केंद्रांच्या यशाबद्दल आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांचे अभिनंदन केले जात आहे. आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी साधन सुविधा पुरविण्यात मेहनत घेतल्याने हे यश मिळले आहे. ही रुग्णालये उत्कृष्टता कायम ठेवत रुग्णांची सेवा करत राहतील. त्यांचा आदर्श राज्यातील अन्य रुग्णालयांनी घ्यावा, यासाठी योजना आखली जाणार अमल्याचे एका वरिष्ट्र आरोग्य अधिकाऱ्याने सांगितले.

SCROLL FOR NEXT