पणजी : आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी डॉ. रुद्रेश कुट्टीकर यांना दिलेल्या अपमानास्पद वागणुकीचा निषेध करीत ‘इंडियन मेडिकल संघटने’ (आयएमए) च्या गोवा शाखा, गोमेकॉतील विभाग प्रमुख, निवासी डॉक्टर आणि विद्यार्थ्यांनी (गार्ड) सोमवारी गोमकॉचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर यांच्या कार्यालयासमोर आंदोलन केले. विविध मागण्या करत आरोग्यमंत्री राणे यांनी गोमेकॉत येऊन 24 तासांत जाहीर माफी मागावी, अशी त्यांनी मागणी केली. तसे न केल्यास पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा दिला.
डॉक्टरांनी मागण्यांचे निवेदन डीन डॉ. बांदेकर यांना दिले. आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी डॉ. रुद्रेश कुट्टीकर यांची जाहीररित्या माफी मागावी, गोमेकॉत येणारे व्हीआयपींचे फोन बंद व्हावेत आणि कोणत्याही विभागात व्हिडिओ चित्रण केले जाऊ नये, या मागण्या डॉक्टरांनी लावून धरल्या. डॉक्टर आंदोलनात सहभागी झाल्याने गोमेकॉच्या सेवेवर परिणाम झाला. सोमवार असल्याने मोठ्या प्रमाणात रुग्ण तपासणीला आले होते, त्यांना बराचवेळ तिष्ठत राहावे लागले. दुपारनंतर आंदोलन तात्पुरते मागे घेण्यात आले. डॉक्टरांनी डीन डॉ. शिवानंद बांदेकर यांच्याशी चर्चा सुरू केली व त्यांना निवेदन दिले, ज्यात प्रामुख्याने वरील मागण्यांचा समावेश आहे. डॉ. रुद्रेश कुट्टीकर यांनी डीनकडे निवेदन दिले. यावेळी आंदोलन प्रमुख डॉ. प्रतिक सावंत यांनी पत्रकारांना मागण्यांची माहिती दिली. डॉक्टरांनी गोमेकॉच्या डीनना कॅम्पसमध्ये परवानगी असलेल्या व्हिडिओग्राफी आणि फोटोग्राफीविरुद्ध एफआयआर दाखल करण्याची विनंती केली. कारण ते सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे उल्लंघन आहे. तसेच मंत्री विश्वजित राणे यांनी गोमेकॉत येऊन डॉ. रुद्रेश यांची जाहीर माफी मागावी. व्हीआयपी संस्कृती थांबवायला हवी अशी मागणी आंदोलक डॉक्टरांनी केली.
ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस (आयटक) या कामगार संघटनेने पत्रक जारी करून गोमेकॉत घडलेल्या घटनेचा निषेध केला. मंत्र्यांनी डॉक्टरांना बेकायदेशीर आणि अपमानास्पद वागणुकीबद्दल आणि त्यांच्या सेवेतून निलंबनाची धमकी दिल्याबद्दल तीव्र संताप व्यक्त केला आहे. आयटकचे सरचिटणीस ख्रिस्तोफर फोन्सेका यांनी हे पत्रक जारी केले आहे.
गोमेकॉ इस्पितळात शनिवारी (दि.7) डॉक्टरसंबंधी झालेल्या प्रकरणात अॅड. सोला अविलिया वाझ यांनी आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्याविरुद्ध पणजी पोलिस ठाण्यात फौजदारी तक्रार दाखल केली आहे.
डॉ. रुद्रेश कुट्टीकर यांना बोललेल्या कठोर शब्दांबद्दल मी त्यांची मनापासून माफी मागतो. त्या क्षणाच्या तीव्रतेत, माझ्या भावना माझ्या अभिव्यक्तीवर मात करत होत्या आणि मी ज्या पद्धतीने परिस्थिती हाताळली त्याबद्दल मला मनापासून खेद वाटतो. कोणत्याही वैद्यकीय व्यावसायिकाच्या प्रतिष्ठेला कमी लेखण्याचा किंवा त्यांचा अनादर करण्याचा माझा कधीही हेतू नव्हता. आपल्या समाजात डॉक्टरांचे पवित्र आणि उदात्त स्थान आहे. ते बरे करण्यासाठी, सांत्वन देण्यासाठी आणि जीव वाचवण्यासाठी अथक परिश्रम करतात. आपल्या राज्यात त्यांच्या योगदानाबद्दल मला सर्वोच्च आदर आहे. माझ्या संवादात मी चूक केली असली तरी, माझा हेतू नेहमीच असा होता की कोणताही रुग्ण वेळेवर काळजी घेण्यापासून वंचित राहू नये आणि आपली सार्वजनिक आरोग्य व्यवस्था प्रतिसादशील आणि दयाळू राहावी. मात्र मी माफी मागितलेली असतानाही गोमेकॉच्या सेवेत व्यत्यय येणे योग्य नव्हे. या परिस्थितीचा फटका जनतेला सहन करावा लागत आहे. दुर्दैवाने आता या मुद्द्याचे राजकारण केले जात आहे, एका व्यावसायिक प्रकरणाला राजकीय संघर्षात रूपांतरित केले जात आहे. डॉक्टरांनी आपले लक्ष उपचार आणि मदत करण्यावर स्थिर ठेवावेत, अशी प्रतिक्रिया डॉक्टरांच्या आंदोलनावर राणे यांनी दिली.