पणजी : पुढारी वृत्तसेवा
गोमंतक भंडारी समाजानेही जात सर्वेक्षण व जनगणनेनंतरच एसटी आरक्षणाची कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. एसटी समाजाची अचूक माहिती व जनगणनेशिवाय आरक्षण लागू करणे अन्यायकारक ठरणार असल्याचा दावा करीत आरक्षणाची घाई करू नये, अशी मागणी केली आहे.
याबाबतचे पत्रक गोमंतक भंडारी समाजाच्या अस्थायी समितीचे अध्यक्ष संजीव नाईक यांनी जारी केले आहे. चार दिवसांपूर्वी अखिल गोमंतक क्षत्रिय मराठा समाजाने जनगणनेपूर्वी एसटी आरक्षण लागू करू नये, अशी मागणी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे केली होती.
याबाबतचे निवेदन त्यांनी मुख्यमंत्र्यांना सादर केले होते. 'डेटा नाही, तर आरक्षण नाही' अशी स्पष्ट भूमिका भंडारी समाजाने घेतली आहे. शेवटची जात जनगणना १९३१ मध्ये झाली होती. गेल्या ९५ वर्षांत लोकसंख्येची समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत.
कोणत्याही ताज्या आकडेवारीशिवाय थेट मतदारसंघ आरक्षित करणे राजकीयदृष्ट्या मनमानी आणि अन्यायकारक ठरेल, अशी भीती समाजाने व्यक्त केली आहे.
या चार मतदारसंघांची निवड नेमक्या कोणत्या आधारावर केली जात आहे? या भागातील एसटी लोकसंख्या आणि मतदारांची सद्यस्थितीतील अधिकृत आकडेवारी कोणाकडे आहे? असा प्रश्नही भंडारी समाजाने विचारला आहे.