वाळपई : अनेकांना प्लॉट देण्याचे आश्वासन देऊन त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळणार्या होंडा येथील ‘बंटी-बबली’कडून वाळपई पोलिसांनी 43 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. विदिशा गावडे व विजयानाथ गावडे अशी त्यांची नावे असून, या प्रकरणी त्यांच्यावर यापूर्वीच गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात संशयितांकडून पैशांची वसुली सुरू करण्यात आली आहे.
वाळपई पोलिसांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, होंडा सत्तरी येथील विदिशा व विजयनाथ गावडे या पती-पत्नीने दोडामार्ग-डिचोली भागात प्लॉट देण्याचे आश्वासन देऊन अनेकांकडून मोठ्या प्रमाणात रक्कम घेतली होती. या संदर्भाची तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर दोघांनाही अटक करण्यात आली होती. न्यायालयाने त्यांची जामिनावर सुटका केली आहे. त्यांच्यावर वाळपईत दोन, डिचोली व फोंडा पोलिस स्थानकात प्रत्येकी एक असे चार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलिस निरीक्षक विदेश शिरोडकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाची चौकशी सुरू असताना या दोघांनी लोकांकडून घेतलेल्या पैशांतून त्यांनी दागिने बनविल्याचे उघड झाले होते. धुळेर म्हापसा येथील एकाच बँकेच्या दोन शाखांमध्ये हे दागिने ठेवण्यात आले होते. त्यानुसार 13 लाख 15 हजार रुपये व 30 लाख रुपये असे 43 लाख 15 हजार रुपयांचे दागिने पोलिसांनी जप्त केले आहेत. संशयितांच्या अन्य मालमत्तांचीही चौकशी सुरू असल्याचे ते म्हणाले.
पोलिसांनी जप्त केलेल्या दागिन्यांसंदर्भात कोणत्याही प्रकारची कायदेशीर पावती आढळली नाही. त्यामुळे हे सोन्याचे दागिने बेकायदा खरेदी करण्यात आले आहेत. रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार त्यांच्यावर कारवाई करावी, अशी सूचना पोलिस निरीक्षक शिरोडकर यांनी शाखा व्यवस्थापकांना केली आहे.