Gomanchali Buffalo Goa  
गोवा

Gomanchali Buffalo Goa | गोव्याच्या 'गोमांचली' म्हशीचा राष्ट्रीय स्तरावर डंका; मिळाली स्वतंत्र देशी जातीची अधिकृत मान्यता!

Gomanchali Buffalo Goa | आयसीएआर, एनबीजीआरकडून नोंदणी : विशिष्ट ओळख क्रमांक बहाल

पुढारी वृत्तसेवा

पणजी : प्रभाकर धुरी
गोव्याच्या 'गोमांचली' या स्थानिक म्हशीला 'भारतीय कृषी संशोधन परिषद' (आयसीएआर), कर्नाल यांच्याकडून स्वतंत्र देशी पशुजात म्हणून राष्ट्रीय मान्यता आणि नोंदणी मिळाली आहे. या नोंदणीमुळे गोमांचली म्हशीला देशातील स्वतंत्र पशुजात म्हणून अधिकृत ओळख प्राप्त झाली आहे.

तसेच गोव्याला या म्हशीचे मूळ अधिवास क्षेत्र अर्थात 'होम ट्रॅक्ट' म्हणून अधिकृत मान्यता देण्यात आली आहे. गोमांचली म्हशीला INDIA_BUFFALO_3500_GOMANCHALI_01023 हा 'विशिष्ट ओळख क्रमांक' देण्यात आला आहे.
गोमांचली ही गोव्याची स्थानिक म्हैस असल्याचे राष्ट्रीय पातळीवर अधोरेखित झाले आहे. स्वतंत्र जात म्हणून नोंदणी झाल्याने या पशुधनाची भौगोलिक आणि कायदेशीर ओळख निर्माण झाली आहे. त्यामुळे या स्थानिक आनुवंशिक संसाधनाचा गैरवापर किंवा 'बायोपायपीसी' रोखण्यास मदत होणार आहे.

'गोमांचली'ची वैशिष्ट्ये

  • 'गोमांचली' म्हैस आकाराने मजबूत आणि काटक असतात.

  • म्हशीची शिंगे वैशिष्ट्यपूर्ण वक्र आकाराची असतात.

  • दमट हवामान आणि मुसळधार पावसातही या म्हशी सग धरतात.

  • या म्हशीच्या अंगावरील कातडीचा रंग काळ्यापासून ते राखाडी छटांपर्यंत असतो.

  • तोंडाचा पुढील भाग साधारणपणे काळा असतो, त्यावर कधी कधी पांढरे डागही आढळतात.

  • ही म्हैस दररोज सरासरी ५ लिटर दूध देते. या दुधात स्निग्ध (फॅट) घटकांचे प्रमाण चांगले असते.

आनुवंशिक संवर्धन आणि कमी खर्चात संगोपन

गोमांचली म्हशींची जनुकीय वैशिष्ट्ये जपण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विशेष निधी व संवर्धन योजना राबविण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. स्थानिक पशुजात म्हणून तिचे संवर्धन, जतन आणि पुढील पिढ्यांपर्यंत तिची वैशिष्ट्ये टिकवण्यासाठी शासकीय पातळीवर नियोजन करता येणार आहे.
गोमांचली म्हैस गोव्याच्या दमट आणि उष्ण हवामानात सहज टिकून राहतात. त्यांना तुलनेने कमी देखभाल आणि खाद्याची गरज भासते. त्यामुळे शेतकरी आणि गोपालकांना संगोपनावरील खर्च कमी होण्यास मदत होते. या म्हशी लवकर वयात येतात. साडेतीन वर्षांच्या आत त्या पहिल्या वेताला तयार होतात. त्यामुळे कळपाची संख्या तुलनेने वेगाने वाढू शकते. याचा शेतकऱ्यांना दीर्घकालीन आर्थिक फायदा मिळू शकतो.

राष्ट्रीय समितीकडून प्रस्तावाची काटेकोर तपासणी

वैज्ञानिक पुरावे, आकडेवारी आणि छायाचित्रांसह सविस्तर प्रस्ताव 'जाती नोंदणी समिती'कडे पाठविला जातो. नवी दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय समितीच्या बैठकीत प्रस्तावाची काटेकोर तपासणी केली जाते. सर्व निकष पूर्ण झाल्यानंतर समितीकडून जातीला अधिकृत मंजुरी, विशिष्ट ओळख क्रमांक आणि केंद्र सरकारच्या गॅझेटमध्ये नोंद मिळते. गोव्याची गोमांचली म्हैस या संपूर्ण प्रक्रियेत उत्तीर्ण झाली असून, तिला राष्ट्रीय स्तरावर स्वतंत्र देशी पशुजात म्हणून मान्यता मिळाली आहे.

'गोपाळ रत्न' पुरस्कारासाठी पात्रता

नोंदणीकृत देशी जातीचे संगोपन करणाऱ्या शेतकऱ्यांना केंद्र सरकारच्या 'राष्ट्रीय गोपाळ रत्न पुरस्कारा'साठी अर्ज करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे गोमांचलीचे संगोपन करणाऱ्या शेतकऱ्यांना राष्ट्रीय पातळीवर सन्मान मिळण्याची संधी निर्माण झाली आहे.

राष्ट्रीय नोंदणीची शास्त्रोक्त प्रक्रिया

पशुधनाची राष्ट्रीय पातळीवर नवीन जात म्हणून नोंदणी करण्यासाठी शास्त्रोक्त आणि दीर्घकालीन प्रक्रिया पूर्ण करावी लागते. ही प्रक्रिया आयसीएआर-एनबीजीआरच्या माध्यमातून राबविण्यात येते. गोमांचलीच्या बाबतीत आयसीएआर-सीसीएआरचे शास्त्रज्ञ तसेच पशुसंवर्धन विभागाचे माजी संचालक स्थानिक भागात जाऊन वर्षभर म्हशींची संख्या, शारीरिक रचना आणि उत्पादकता अभ्यास करतात.

या प्रक्रियेत म्हशींचा रंग काळा ते राखाडी असल्याची नोंद, शिंगांचा विल्यासारखा आकार आणि इतर शारीरिक गुणधर्मांचा सविस्तर अभ्यास करण्यात येतो. वैज्ञानिक संशोधन व जनुकीय चाचणीसाठी रक्त आणि डीएनएचे नमुनेही घेतले जातात. गोमांचली ही मुऱ्हा किंवा जाफराबादी यांसारख्या अस्तित्वात असलेल्या जातींपेक्षा स्वतंत्र जात आहे, हे जनुकीयदृष्ट्या सिद्ध करणे आवश्यक असते.

दूध उत्पादनातून आर्थिक लाभ

गोमांचली म्हशींची सरासरी दूध उत्पादन क्षमता सुमारे पाच लिटर प्रतिदिन आहे. अधिकृत देशी जात म्हणून मान्यता मिळाल्याने या म्हशींच्या खरेदी-विक्रीला व्यावसायिक मूल्य प्राप्त होण्याची शक्यता आहे. त्याचा थेट फायदा स्थानिक शेतकरी आणि गोपालकांना होऊ शकतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT