पणजी : गोव्यातील दोन जिल्हा पंचायतीच्या एकूण 50 जागांसाठी आज शनिवारी (दि.20) मतदान होत आहे. उत्तर गोव्यातील 25 जागांसाठी 111 उमेदवार आणि दक्षिण गोव्यातील 25 जागांसाठी 115 उमेदवार असे एकूण 50 जागांसाठी 226 उमेदवार रिंगणात आहेत.
भारतीय जनता पक्ष आणि मगो पक्ष यांची युती, कॉंग्रेस आणि गोवा फॉरवर्ड यांची युती त्याचबरोबर आम आदमी पक्ष आणि स्थानिक रिव्होल्युशनरी गोवन्स पक्ष (आरजी)अशी चौरंगी लढत यावेळी जिल्हा पंचायतीसाठी होत आहे. काही मतदारसंघात अपक्ष निवडणूक लढवत आहेत.
मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या साखळी विधानसभा क्षेत्रातील पाळी या जिल्हा पंचायत मतदारसंघांमध्ये दुरंगी लढत होत आहे. राज्यातील सुमारे साडेआठ लाख मतदार यावेळी मतदान करत आहेत. गोव्यामध्ये थंडी भरपूर पडत आहे, सकाळी आठ वाजता मतदान सुरू झाल्या झाले. नंतर गर्दी होणार म्हणून अनेक जण थंडीमध्ये ही मतदान केंद्रावर पोहोचले आणि त्यांनी मतदानाचा हक्क बजावला. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मतदान होणार असून यावेळी मतपत्रिकेद्वारे मतदान होत आहे. सोमवार दिनांक 22 डिसेंबर रोजी मतमोजणी होईल.