Dr. Pramod Sawant 
गोवा

Dr. Pramod Sawant | युवक, महिलांना मिळणार कौशल्य प्रशिक्षण : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

स्वयंपूर्ण आणि विकसित गोव्याचे ध्येय साध्य करण्यावर भर

पुढारी वृत्तसेवा

पणजी : स्वयंपूर्ण आणि विकसित गोव्याचे ध्येय साध्य करण्यासाठी राज्यातील युवक आणि महिलांना विविध क्षेत्रांत कौशल्य प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

दोनापावला येथील लोकभवन सभागृहात बुधवारी आयोजित स्वयंपूर्ण कौशल्य मेळाव्यात ते बोलत होते. कौशल्य विकास, रोजगाराच्या संधी, आर्थिक साहाय्य आणि उद्योजकतेच्या माध्यमातून गोव्यातील महिला व युवकांना सक्षम करण्याच्या उद्देशाने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे, असे मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले.

राज्यातील १६ सरकारी खात्यांच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या ६० योजनांद्वारे युवक आणि महिलांसाठी विविध संधी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. कृषी, मत्स्य व्यवसाय, पशुपालन, पर्यटन, आरोग्य सेवा, किरकोळ विक्री आणि अन्न प्रक्रिया अशा विविध क्षेत्रांत रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी आहेत. या संधींचा लाभ घेता यावा, यासाठी आवश्यक कौशल्य प्रशिक्षण दिले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या मेळाव्याच्या माध्यमातून २४ एजन्सींद्वारे उद्योगाभिमुख प्रशिक्षण अभ्यासक्रम, शिकाऊ उमेदवारीच्या संधी, आर्थिक साहाय्य तसेच नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा विद्यमान व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जात आहे, असेही त्यांनी नमूद केले.

नारी शक्ती आणि युवा शक्तीला प्राधान्य

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले की, युवकांसह विशेषतः १८ ते ५० वयोगटातील महिलांनी या मेळाव्यात सहभागी होऊन उपलब्ध संधींचा लाभ घ्यावा. आर्थिक स्वावलंबनाच्या दिशेने आत्मविश्वासाने पाऊल टाकण्यासाठी महिलांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. एखादी महिला आत्मनिर्भर झाली, तर ती संपूर्ण कुटुंबाला सक्षम बनवते. नारी शक्ती, युवा शक्ती आणि सामूहिक प्रयत्नांच्या बळावर स्वयंपूर्ण गोवा आणि विकसित गोवा २०३७ हे ध्येय साध्य करण्याच्या दिशेने राज्याची वाटचाल सुरू असल्याचेही मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT