गोव्याला लवकरच मिळणार 500 इलेक्ट्रिक बसेस File photo
गोवा

गोव्याला लवकरच मिळणार 500 इलेक्ट्रिक बसेस

करण शिंदे

पणजी : पुढारी वृत्तसेवा

कदंबच्या ताफ्यात लवकरच 500 इलेक्ट्रिक बसेस सामील होण़ार आहेत. वाहतूक मंत्री मावीन गुदिन्हो यांनी बुधवारी (दि.28) दिलेल्या माहितीनुसार, आयआयटी अ‍ॅल्युमनी कौन्सिलकडून सीएसआर फंडातून योजनेतून गोव्याला सुमारे 700 कोटी रुपये खर्चाच्या 500 इलेक्ट्रिक बसेस आणि काही चार्जिंग स्टेशन उपलब्ध होणार आहेत. या बसेस लवकरच राज्यात दाखल होतील. त्यानंतर त्या कदंबच्या ताफ्यात दिल्या जातील.

या बसेस स्पेशल परपज व्हेईकल समितीच्या माध्यमातून सुरू होतील. या समितीमध्ये कदंबचे चार, सरकारचे दोन व आयआयटी अ‍ॅल्युमनी कौन्सिलचे चार सदस्य असतील. या बसेस गोव्यात आल्यानंतर राज्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत भरीव सुधारणा होणार असून ज्या 15 वर्षे जुन्या बसेस ग्रीन परवाने घेऊन सध्या रस्त्यावर धावत आहेत. त्या वाहतुकीतून कमी करता येतील, असे गुदिन्हो म्हणाले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील गोवा सरकार राज्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारणा करुन वाहनांची रस्त्यावरील गर्दी कमी करण्यासाठी विविध उपाय योजत आहे. सर्वसामान्य जनतेला प्रवास करताना दिलासा मिळण्यासाठी सरकार सीएसआर सारख्या माध्यमातून विविध सुविधा उपलब्ध करत असल्याचे गुदिन्हो म्हणाले.

‘ना नफा ना तोटा’ तत्त्वावर बसेस

गोव्याला ‘सीएसआर’ निधीतून इलेक्ट्रिक बसेस मिळाव्यात, अशी मागणी मुख्य सचिव पुनितकुमार गोयल यांनी काही महिन्यांपूर्वी आयआयटी अ‍ॅल्युमनी कौन्सिलकडे केली होती. ही मागणी मान्य झाली असून ‘सीएसआर’ निधीतून 700 कोटी रुपये खर्चून गोव्याला 500 इलेक्ट्रिक बसेस देण्याचे आयआयटी अ‍ॅल्युमनी कौन्सिलने मान्य केले आहे. त्याचसोबत काही जागी या बसेससाठी चार्जिंग केंद्रेही आयआयटी अ‍ॅल्युमनी कौन्सिल बांधणार आहे. ‘ना नफा ना तोटा’ या तत्त्वावर राज्यात या बसेस सुरू केल्या जाणार आहेत, अशी माहिती गुदिन्हो यांनी दिली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT