Goa Water Shortage Guidelines File Photo
गोवा

Goa Water Shortage Guidelines | ...तर 1 जुलैपासून पाण्याच्या वापरावर मर्यादा

Goa Water Shortage Guidelines | मंत्री सुभाष फळदेसाई : पाणी वापराविषयी मार्गदर्शक तत्त्वे होणार जारी

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा

आणखी 15 दिवस पाऊस न पडल्यास आणि स्थिती अशीच राहिल्यास 1 जुलैपासून पाण्याच्या वापरावर मर्यादा येणार. सध्या आवश्यक पाणी साठा असला तरी पाण्याच्या वापरासंदर्भात मार्गदर्शक तत्त्वे जारी होणार. पाण्याचा वापर आवश्यक तेवढाच करावा, यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी होणार, असे पेयजल खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई यांनी सांगितले.

राज्यात मान्सूनचे आगमन झाले असले तरी अजून पावसाचा पत्ता नाही. पावसाचे प्रमाण ५९.१ टक्के कमी आहे. दर दिवशी ऊन पडण्याबरोबरच तापमान वाढत आहे. धरणातील पाण्याची पातळी कमी होत असल्याने पाणी टंचाई निर्माण होण्याची भीती आहे. या पार्श्वभूमीवर पाण्याच्या वापरासंदर्भात मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्याचा निर्णय खात्याने घेतला आहे. पाऊस नसल्याने पाण्याची टंचाई निर्माण होण्याची भीती आहे.

योग्य व्यवस्थापनामुळे अजून पर्यंत पाण्याची कमतरता झाली नाही. त्यासाठी सर्व परिसरात पूर्वी सारखाच पाणीपुरवठा सुरू आहे. तरी सुद्धा खबरदारीचा उपाय म्हणून पाण्याचा वापर करण्यासंदर्भात मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्याचा निर्णय झाला आहे.

नळाचे पाणी बरेच जण बागेतील झाडे शिंपण्यासाठी तसेच वाहने धुण्यासाठी करीत असतात. तो करू नये तसेच नळाच्या पाण्याचा वापर वॉशिंग सेंटरमध्ये सुद्धा होतो. पिण्याच्या पाण्याचा वापर इतर कामांसाठी करता येणार नाही, असे मंत्री सुभाष फळदेसाई यांनी स्पष्ट केले.

पाऊस आणखी १५ दिवस पडला नाही, तर पाण्याच्या वापरावर मर्यादा लागू करण्याशिवाय पर्याय राहणार नसल्याचे, त्यांनी सांगितले. गेल्या वर्षी मे संपेपर्यंत पाण्याची कमतरता भासत होती. योग्य व्यवस्थापनामुळे यावर्षी पाण्याची कमतरता अजूनपर्यंत झाली नाही. वास्को येथे ८० एमएलडी पाण्याची गरज होती. सध्या वास्को शहरासाठी २० एमएलडी पाणी उपलब्ध झाले असल्याचे मंत्री फळदेसाई यांनी सांगितले.

दरम्यान, वाळपई येथील नळाच्या पाण्यातून पुन्हा जंतू आढळल्याच्या घटना समोर आल्या आहेत. याप्रकरणी अधिकाऱ्यांना तातडीने पाण्याचे नमूने घेऊन तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याची माहिती मंत्री फळदेसाई यांनी सांगितले.

सांगे येथे आवश्यक पाणी

सांगे येथे सर्व परिसरात आवश्यक तेवढे पाणी मिळते. आता निवडणूक जवळ आल्याने पाण्याचे प्रश्न उपस्थित व्हायला लागले आहेत. सांगे येथे तक्रारी असलेल्या ठिकाणी उपजिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी करून पाण्याची तपासणी सुद्धा केली. आता कसलीच समस्या नाही

मोबाईल कंपनीविरुद्ध एफआयआर

तोरसे - पेडणे येथे एका मोबाईल कंपनीचे काम सुरू असताना पाण्याची वाहिनी फुटली. त्यामुळे पाणी वाया गेले. खात्याने सदर कंपनीला नोटीस जारी केली आहे.

एफआयआर दाखल होऊन पाण्याच्या हानीची भरपाई कंपनीकडून वसूल करणार. पाऊस आला तरी सार्वजनिक बांधकाम खाते, वीज खात्याकडून खोदकाम सुरू आहे. त्यामुळे जलवाहिनी फुटण्याची शक्यता असते, असे त्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT