vehicle auction Pudhari
गोवा

Vehicle Auction 2026 | सरकारी 27 वाहने काढणार लवकरच भंगारात

Vehicle Auction 2026 | कचरा व्यवस्थापन महामंडळाची माहिती : प्रक्रियेला सुरुवात; लवकरच लिलाव

पुढारी वृत्तसेवा

पणजी: गोवा कचरा व्यवस्थापन महामंडळाने विविध सरकारी खात्यांमधील १५ वर्षांपेक्षा जुनी आणि वापरातून बाद झालेली २७ वाहने भंगारात काढली आहेत. सामान्य नागरिकांना सीलबंद निविदांद्वारे ही वाहने खरेदी करता येणार असून, यासाठी सर्वाधिक बोली लावणाऱ्यास प्राधान्य दिले जाईल. महामंडळाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, विविध सरकारी खाती, महामंडळे आणि स्वायत्त संस्थांची ही वाहने लिलावासाठी उपलब्ध करण्यात आली आहेत.

या सर्व २७ वाहनांची एकत्रित किमान आधारभूत किंमत ३२.६४ लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे. ही वाहने ज्या स्थितीत आहेत, त्याच स्थितीत ग्राहकांना कोणतीही तक्रार न करता स्वीकारावी लागणार आहेत. इच्छुकांना १८ ते २२ मे दरम्यान सकाळी ९.३० ते सायंकाळी ५.४५ या वेळेत संबंधित ठिकाणी जाऊन वाहनांची पाहणी करता येईल.

२५ मे रोजी सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत सीलबंद निविदा पेटीत टाकावी. सर्वाधिक किंमत नमूद केलेले अर्ज जमा करावे लागतील आणि २६ मे रोजी निविदापेटी उघडून सर्वाधिक बोली लावणाऱ्यांना वाहने दिली जातील. या लिलावासाठी २७ वाहनांचे दहा लॉटमध्ये (गट) विभाजन करण्यात आले असून, प्रत्येक लॉटमध्ये एक ते पाच वाहने आहेत.

इच्छुकांना एका स्वतंत्र वाहनाऐवजी संपूर्ण लॉटसाठी एकत्रित बोली लावावी लागणार आहे. पहिल्या लॉटमध्ये फुटबॉल महामंडळाची टाटा सुमो (किमान किंमत ६० हजार रुपये), दुसऱ्या लॉटमध्ये दोन टाटा एस पिकअप (६८,८०० रुपये) आणि तिसऱ्या लॉटमध्ये पुराभिलेख खात्याची महिंद्रा बोलेरो (५० हजार रुपये) आहे.

रुग्णवाहिकांसह दुचाकींचा समावेश चौथ्या लॉटमध्ये पोलिस खात्याच्या दोन बुलेट (९,७८० रुपये) आणि पाचव्या लॉटमध्ये तीन स्प्लेंडर मोटरसायकली (९,७०० रुपये) आहेत. आठव्या लॉटमध्ये आरोग्य सेवा संचालनालयाच्या सात टाटा विंगर रुग्णवाहिका (३.७८ लाख रुपये), नवव्या लॉटमध्ये लेखा संचालनालयाची महिंद्रा बोलेरो (५० हजार रुपये) आणि दहाव्या लॉटमध्ये दंत महाविद्यालयाची टाटा व्हॅन (१.४५ लाख रुपये) उपलब्ध आहे.

कदंब महामंडळाच्या बसेसही लिलावात

सहाव्या लॉटमध्ये कदंबची एक व्होल्वो व तीन मिनी बस असून त्यांची किमान किंमत ९.५० लाख रुपये ठेवण्यात आली आहे. सातव्या लॉटमध्ये कदंबच्या पाच कोरोना स्कायपॅक बस असून त्यांची किमान किंमत १५.४२ लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे. स्प्लेंडर आणि बुलेटची किंमत तीन ते चार हजार रुपयांपासून सुरू होत असून, व्होल्वो बस सुमारे साडेचार लाखांच्या किमतीपासून लिलावात ठेवली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT