नववर्षात गावठी वांग्यांना मोठी मागणी असून दर १२० ते १६० रुपये नग आहेत.
टोमॅटो, कांदा आणि बटाट्यांचे दर स्थिर राहिल्याने भाजी खरेदी सुसह्य झाली आहे.
रब्बी हंगामातील उत्पादनामुळे ताज्या गावठी भाज्यांची आवक वाढली आहे.
कडधान्य व डाळी महागल्याने मात्र घरगुती अर्थसंकल्पावर ताण जाणवत आहे.
मडगाव : पुढारी वृत्तसेवा
यंदा नववर्षात विशेष लक्ष वेधून घेत आहेत ते गावठी वांगी. ती प्रती नग १२० ते १६० रुपये दर असूनही या वांग्यांना मोठी मागणी आहे. चव, टिकाऊपणा आणि स्थानिक उत्पादन यामुळे ग्राहक गावठी वांग्यांना पसंती देत आहेत. इतर भाज्यांचे दर मात्र फारसे चढ-उतार न दाखवता स्थिर राहिल्याने दैनंदिन भाजी खरेदी काहीशी सुसह्य झाली आहे.
ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात केलेल्या लागवडीचा फायदा आता बाजारात दिसून येत आहे. लाल भाजी, मुळे, भेंडी आणि गवार यांची आवक वाढली असून ताज्या पालेभाज्यांनी बाजाराला हिरवळ प्राप्त झाली आहे. शेतकऱ्यांच्या थेट विक्रीमुळे ग्राहकांना ताजी भाजी मिळत असून बाजारातील हालचाल वाढली आहे.
दरम्यान, कांदे आणि बटाट्यांचे दर स्थिर असले तरी टोमॅटोच्या दरात गेल्या दोन आठवड्यांपासून घसरण झाली आहे. सध्या टोमॅटो प्रतिकिलो ४५ रुपये दराने विकला जात आहे. मात्र, कडधान्य आणि डाळींच्या किमतीत वाढ झाल्याने घरगुती अर्थसंकल्पावर ताण जाणवत आहे. चणे, मसूर, तूर, उडीद आणि मूग तसेच त्यांच्या डाळींचे दर वाढलेले असून भाजी स्वस्त असली तरी कडधान्य महागल्याची चर्चा बाजारात सुरू आहे.
टोमॅटो, कांद्याचे भाव स्थिर
पणजीत मार्केटमध्ये टोमॅटो प्रतिकिलो ६० रु. दराने, तर फलोत्पादनकडे ५७ रु. किलो दराने विकले जात आहेत. मागच्या रविवारी मार्केटमध्ये ६०, तर फलोत्पादनकडे ५३ रु. किलो असा दर होता. या आठवड्यात फलोत्पादन महामंडळाने किलोमागे ४ रुपये वाढवले आहेत. तत्पूर्वी तो ५९ रु. ही होता.
मात्र, गेले दोन आठवडे मार्केटमध्ये टोमॅटोचा दर ६० रु. किलो ठेवण्यात आला आहे. टोमॅटोचा दर वाढवला, तर ग्राहक फिरकणार नाहीत, अशी भीती मार्केटमधील व्यापाऱ्यांना वाटत असल्याने त्यांनी दर स्थिर ठेवला आहे. फलोत्पादनकडे कांद्याचा भावही ३१ रु., बटाट्याचा २६ रु., तर मार्केटमध्ये कांदा ४०, तर बटाटा ३० रु. किलो दराने विकला जात आहे.
गाजराचा दर बाजारात ८० रु., तर फलोत्पादनकडे म्हणजे ४५ रु. किलो आहे. फलोत्पादनकडे भेंडी ६० रु., तर बीट ३४ रु. किलो झाला आहे. मिरची ६१ रु., आहे. आले १०९ रुपये, तर लसूण २४४ (५६ रु. दरवाढ) रुपये, कोबी २४ रु. नग, वालपापडी ५४ रु., चिटकी ५० रु., कारली ७९ रुपये, ढब्बू मिरची ९४रु. किलो झाली आहे.
मिरची आणि लसूण वगळता इतर भाज्यांचे दर कमी झाले आहेत. मार्केटमध्ये भेंडी ८० रु., बीट ८० रु., मिरची ८०-१०० रु., लसूण१२०, २६०, ३२० रु. किलो आहे, तर वालपापडी १०० रु., चिटकी ६० - ७० रु., कारली ८० ९० रु., ढब्बू मिरची ९०-१०० रु. किलो आहे. कोबी, फ्लॉवर ४०-५० रुपये नग आहे. गावठी भाजी मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाली आहे.