Goa Fire News Pudhari
गोवा

Goa Fire Incident : वास्कोत आगीचा तांडव; तिलक मैदान कॉम्प्लेक्ससह मॉर्डन मार्केटमधील दुकानांचे मोठे नुकसान

बुधवारी रात्री दोन ठिकाणी आगीच्या घटना

पुढारी वृत्तसेवा

दाबोळी : वास्को येथे बुधवारी (दि.28) रात्री आगीच्या दोन घटनांनी खळबळ उडाली. तिलक मैदान कॉम्प्लेक्समधील वाहनांचे सुटे भाग विकणाऱ्या दुकानाला अचानक आग लागून दुकान जळून खाक झाले. तर दुसऱ्या घटनेत मुरगाव नगरपालिका क्षेत्रातील ‘मॉर्डन मार्केट’च्या पहिल्या मजल्यावर भीषण आग लागली. या आगीत पहिल्या मजल्यावरील कपड्यांचे साहित्य विकणाऱ्या दुकानांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच आगीची झळ तळमजल्यावरील दुकानांनाही बसली.

बुधवारी रात्री सुमारे ११.४५ वाजल्यानंतर मॉर्डन मार्केटमध्ये आग लागल्याची घटना घडली. काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केल्याने परिसरात घबराट पसरली. पहिल्या मजल्यावरील दुकानांना आगीने वेढल्याने तेथील साहित्य जळून खाक झाले. आगीची तीव्रता वाढल्याने तळमजल्यावरील दुकानांनाही तिची झळ बसली.

आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांना मोठ्या प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागली. मध्यरात्रीनंतरही आग धुमसत असल्याने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी जवानांचे प्रयत्न सुरू होते. घटनेची माहिती मिळताच आमदार कृष्णा साळकर, वास्को पोलीस, स्थानिक नागरिक आणि संबंधित दुकानदार घटनास्थळी दाखल झाले. आगीमुळे व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याची शक्यता व्यक्त होत असून, परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT